आंबोली : आंबोली कावळेसाद येथे दरीत कोसळलेल्या कोल्हापुरातील पर्यटकांचा मृतदेह सापडला. आज, शनिवारी एनडीएआरएफ तसेच स्थानिक गेळे ग्रामस्थ, पोलिसांनी संयुक्त मोहिम राबवून दीडशे फूट खोल दरीतून राजेंद्र बाळासाहेब सनगर (वय-४५, चिले कॉलनी कोल्हापूर) यांचा मृतदेह बाहेर काढला. आंबोली येथे वर्षा पर्यटनासाठी कोल्हापूर येथील जिल्हा परिषदचे अधिकारी व कर्मचारी आले होते. त्यातील राजेंद्र सनगर हे कावळेसाद पॉईंट येथे रेलिगच्या बाजूला फोटो काढत असताना तोल जाऊन दरीत कोसळले.
ही घटना काल, शुक्रवारी सायंकाळी घडली होती. दरीत कोसळलेल्या तरूणाच्या शोधासाठी आज, शनिवार सकाळपासून एनडीएआरएफ तसेच स्थानिक गेळे ग्रामस्थ, पोलीस यांनी संयुक्त मोहीम राबवली. एनडीएआरएफचे पथक पोलिसांच्या मदतीने दरीत उतरले होते. यावेळी सनगर यांचा मृतदेह दीडशे ते दोनशे फूट खाली आढळून आला.


