पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा साखरपुडा १० एप्रिल रोजी पार पडला होता. यानंतर आता पवार कुटुंबात पुन्हा एकदा आनंदाचे वातावरण आहे. जय पवारांनंतर त्यांचे चुलत बंधू, शरद पवारांचे नातू आणि अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार यांचाही नुकताच साखरपुडा पार पडला आहे. सुप्रिया सुळे यांनी या साखरपुड्याची माहिती दिली आहे.
युगेंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना हटके शुभेच्छा दिल्या होत्या. “आता किती दिवस एकट्याचेच अभिनंदन करायचे, आम्हाला अक्षता टाकायच्या आहेत. आता फार लांबवू नका,” असे म्हणत त्यांनी युगेंद्र पवारांना लवकरच विवाहबंधनात अडकण्याची सूचना केली होती. त्यांच्या या शुभेच्छांनंतर आता युगेंद्र पवारांनी साखरपुडा उरकला आहे. हा साखरपुडा सोहळा केवळ जवळच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत पार पडला. युगेंद्र पवारांच्या साखरपुड्याची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू होती, परंतु त्यांची होणारी पत्नी कोण आहे, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नव्हती. यावर आता अखेर पडदा पडला आहे.


