सावंतवाडी : आपण ज्या समाजात जन्मलो त्या समाजाचं काहीतरी देणं लागतो. या उदात्त भावनेने मागील कित्येक वर्ष जिमखाना मित्र ग्रुप सातत्याने सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात विधायक उपक्रम राबवित आहे. त्यांचे हे कार्य अत्यंत कौतुकास्पद असून इतरांनीही जिमखाना मित्र ग्रुपचा आदर्श घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते तथा पत्रकार प्रा. रुपेश पाटील यांनी केले. सावंतवाडी येथील जिमखाना मित्र ग्रुपच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप कार्यक्रमाप्रसंगी प्रा. पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ग्रुपचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते अजित सांगेलकर, सचिव संदीप इंगळे तसेच महिला उद्योजिका दिपाली दळवी, सामाजिक कार्यकर्ते वैभव सांगेलकर, लहू गावडे, मुजीब मणियार, आफरीन शेख यांसह अन्य उपस्थित होते.

यावेळी प्रा. रूपेश पाटील पुढे म्हणाले, मुलांनो बाल वयात आपल्यावर झालेले संस्कार हे आपणास नेहमी पुढील आयुष्यात उपयुक्त ठरतात. म्हणून आपल्यावर शालेय जीवनात आणि बालवयात बिंबवलेले संस्कार जपून आयुष्य जगावे. कारण आजपर्यंत जे जे महान व्यक्ती होऊन गेलेत त्यांच्या आयुष्यात बालपणातच योग्य पद्धतीने संस्कार झालेले आढळतात. त्यामुळे आपणही संस्कारांची जपणूक करावी, असे आवाहनही प्रा. पाटील यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष अजित सांगेलकर यांनी केले. सूत्रसंचालन कु. नेहा सांगेलकर हिने केले. शेवटी उपस्थितांचे आभार मंडळाचे सचिव संदीप इंगळे यांनी मानले.


