धुळे : लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं, मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं जोरदार पुनरागमन केलं. राज्यात महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाला समोरं जावं लागलं. विधानसभा निवडणुकीत महायुतीचे 232 उमेदवार विजयी झाले तर महाविकास आघाडीला अवघ्या 50 जागांवर समाधान मानावं लागलं. राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला.
दरम्यान विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवानंतर महाविकास आघाडीला गळती लागल्याचं पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीमधील अनेक नेत्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला आहे. याचा सर्वात मोठा फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसला आहे. मात्र दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसमधील नेते देखील भाजप आणि शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत असल्याचं पाहायला मिळत आहे. पक्षाला लागलेली गळती महाविकास आघाडीसाठी डोकेदुखी ठरत आहे.
राज्यात पुढील काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. मात्र आता त्याचपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष माजी आमदार कुणाल पाटील उद्या भाजपात प्रवेश करणार आहेत. हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. धुळे तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते आजच मुंबईच्या दिशेनं रवाना झाले आहेत. हे कार्यकर्ते कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यामध्ये जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्यांसह सरपंच, उपसरपंच आणि बाजार कमिटी सभापती, संचालकांचा समावेश आहे. एवढ्या मोठ्या संख्येनं भाजपात प्रवेश होणार असल्यानं जिल्हयात काँग्रेसला मोठा खिंडार पडलं आहे. धुळे जिल्ह्यात कुणाल पाटील यांची मोठी ताकत आहे, यामुळे धुळे जिल्ह्यात आता भाजपाचं बळ वाढणार आहे.
दरम्यान दोनच दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता, याच मेळाव्यात त्यांनी पक्ष सोडण्याचे संकेत दिले होते. कार्यकर्त्यांचा विचार घेऊन आपन निर्णय घेऊ असं त्यांनी म्हटलं होतं. त्यांच्या मेळाव्यात काँग्रेसच्या एकाही नेत्याचा फोटो नव्हता, तेव्हाच कुणाल पाटील हे भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली होती. अखेर ते आता उद्याच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.


