सावंतवाडी : विद्यार्थ्यांनी नेहमी आपली अभिरुचीनुसार करिअर निवडावे. कोणी काय सांगेल त्यापेक्षा आपल्या आवडीला आणि आपल्या हृदयाला जे आवडेल त्या क्षेत्राला प्राधान्य द्यावे, असे मत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी केले. श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे सावंतवाडी संस्थानचे भूतपूर्व अधिपती पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज तथा श्री पंचम खेमराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने विचार मंचावर ते बोलत होते.
जिल्हाधिकारी श्री. पाटील पुढे म्हणाले की, कोकणामधील विद्यार्थी गुणवत्तेने पुढे आहेत. मात्र त्यांनी स्पर्धा परीक्षेची कास धरली पाहिजे. आपल्या आवडीचे करिअर निवडले पाहिजे. यामध्ये जिद्द आणि कष्ट महत्वाची आहे. विद्यार्थ्यांनी ग्रुपने अभ्यास केला पाहिजे ,चर्चा केली पाहिजे, शेअर केले पाहिजे. चर्चेच्या माध्यमातूनच जास्तीत जास्त अभ्यास होत असतो. त्यांनी थ्री इडियट्स या सिनेमाचे उदाहरण देऊन काबील बनो असा संदेश दिला. कोकणामध्ये पर्यटनास खूप संधी आहे. त्यामुळे पर्यटनावर आधारित व्यवसाय, उद्योग केले पाहिजे. निसर्ग आहे तसाच ठेवून आपण पर्यटनाला विकसित केले पाहिजे.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजे साहेब श्रीमंत खेमसावंत भोंसले असे म्हणाले की, सावंतवाडी संस्थान हे अत्यंत दुर्गम भागामध्ये व छोटे संस्थान होते, त्यांचा महसूल ही कमी होता. त्यामुळे त्या काळातील एकंदर भारतातील संस्थानिका प्रमाणे इतिहासाने नोंद घेतली नाही. मात्र तरीही बापूसाहेब महाराजांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये या दुर्गम क्षेत्रामध्ये शिक्षण, आरोग्य, शेती, व्यापार यासारख्या क्षेत्रांमध्ये कार्य केले. नव्या पिढीने याचा विचार करून आपला इतिहास उज्वल केला पाहिजे असे ते म्हणाले. यावेळी इयत्ता बारावी कला, वाणिज्य, विज्ञान या शाखेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच भौतिकशास्त्र विभागातील
प्रा. डॉ. एस व्ही पाटील हे दक्षिण कोरीया येथील विद्यापीठा च्या निमंत्रणा वरून ,वैज्ञानिक पेपर सादरीकरणांसाठी गेलेले होते.या बद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी खेमराजीय या वार्षिक अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या आरंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी एल भारमल यांनी शैक्षणिक वर्ष 2024- 25 मधील संस्थेच्या विविध उपक्रमांचा व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा आढावा घेतला.
यावेळी संस्थेच्या चेअरमन राणीसाहेब सौ.शुभदादेवी खेमसावंत भोंसले , संस्थेचे कार्यकारी विश्वस्त युवराज लखमसावंत खेमसावंत भोंसले सावंतवाडीचे प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसीलदार श्रीधर पाटील, संस्थेचे संचालक प्रा डी टी देसाई, सहसंचालक एडवोकेट शामराव सावंत, नियामक मंडळाचे सदस्य डॉ. सतीश सावंत, सदस्य जयप्रकाश सावंत, संस्थान प्रेमी नागरिक,महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा एम व्हि.भिसे यांनी बापूसाहेब महाराजांच्या कार्याचा परिचय करून दिला. तर सूत्र संचालन प्रा डॉ पी जी नाईक यांनी केले.


