सावंतवाडी : अलीकडच्या काळात मोबाईल आणि विविध तंत्रज्ञानाच्या युगात वाचन संस्कृतीचा ऱ्हास होत आहे. हे थांबवून वाचन संस्कृती वाढविण्यासाठी सर्वांनी ग्रंथालयात येऊन वाचन करावे. शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाची कास धरावी, असे आवाहन आजगाव मराठी ग्रंथालयाचे अध्यक्ष रामचंद्र उर्फ अण्णा झांटये यांनी केले. सावंतवाडी तालुक्यातील आजगाव येथील मराठी ग्रंथालय येथे नव्याने खरेदी करण्यात आलेल्या विविध पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. याप्रसंगी श्री. झांटये बोलत होते. यावेळी माजी केंद्रप्रमुख विलासानंद मठकर, आजगाव केंद्र शाळा क्रमांक १ चे प्रभारी मुख्याध्यापक दत्तगुरु कांबळी, आजगाव प्राथमिक शाळेच्या सर्व शिक्षिका, विद्यार्थी, वाचनालयाच्या नियमित वाचक व सदस्या श्रीमती सरोज रेडकर तसेच ग्रंथपाल, ग्रंथालय सहाय्यक, व इतर मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान यावेळी उपस्थित असलेल्या माजी केंद्रप्रमुख विलासानंद मठकर व प्रभारी मुख्याध्यापक दत्तगुरु कांबळी यांनीही ग्रंथालयाचे महत्त्व विशद केले. यावेळी ग्रामस्थ व शिक्षण प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


