सावंतवाडी : शहरातील जुना शिरोडा नाका येथे रस्त्यांवर विशेषत: व्यापारी पसंकुल असलेल्या परिसरात दररोज अनेक मोकाट गुरे रस्त्याच्या अगदी मध्यभागी बसून ठाण मांडतात. अनेकदा या गुरांमुळे अपघातही यापूर्वी झालेले आहेत. उभ्या राहिलेल्या गुरांमुळे वाहतुक व्यवस्थेला अडसर निर्माण होतो. यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. गायी, बैलं या पाळीव जनावरांचे मालक जनावरांना रोज रस्त्यावर सोडून देत असल्यामुळे नागरिकांच्या समस्या वाढल्या असून येथे अपघात झाला तर याला जबाबदार त्या पाळीव प्राण्याचा मालक असणार आहे. एखाद्या गाईचा जीव वाहनाच्या धडकेमुळे गेल्यास गो हत्याचा गुन्हा मोकाट सोडणाऱ्या त्या गाईच्या मालकावर व्हावा, अशीही मागणी सजग नागरिकांनी सावंतवाडी नगरपरिषद प्रशासनाला निवेदनाद्वारे केली आहे.

आपल्या निवेदनात नागरिकांनी सदर मोकाट जनावरे त्वरित हटवावीत व त्यांच्यावर नियंत्रण ठेवावे, ज्या व्यक्तीच्या जनावरांमुळे ही अडचण होते त्या जनावरांच्या मालकांवर कायदेशीर कारवाई करावी. तसेच गोशाळा किंवा तात्पुरते आश्रय स्थळ या जनावरांसाठी उभारण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते संजय वरेरकर, अजय गोंदावळे, कल्पेश गावडे, आनंद पुरळकर, समीर कवठणकर, विनय घुले, आदित्य राऊळ, बत्याव फर्नांडिस, किशोर कदम, बिट्टू देसाई, पॉल डिसोजा, अंकिता कुबल, गंगाधर कुंभार, गौरव राऊळ, भूषण सावंत, आनंद वेंगुर्लेकर, विजय ओटवणेकर, सुकन्या टोपले, अरुण पडवळ, जॉन डिसोजा, पांडुरंग गावडे, सोहम परब, संजय नाईक, राज वरेरकर, पीटर डिसोजा, रुपेश पाटील यांसह परिसरातील अनेक नागरिकांच्या स्वाक्षर्या आहेत.


