सावंतवाडी : येथील आत्महत्या केलेल्या प्रिया चव्हाण या विवाहितेच्या कलंबिस्त येथील माहेरकडच्या कुटुंबीयांची शिवसेना उबाठा पक्षाचे ज्येष्ठ नेते व रत्नागिरी सिंधुदुर्गचे माजी खासदार विनायक राऊत पुढील आठवड्यात भेट घेणार असून मयत प्रियाला न्याय देण्यासाठी संपूर्ण शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते खंबीर पाठीशी असल्याची माहिती जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, सावंतवाडी विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ यांनी दिली.
आज शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सावंतवाडी पोलीस स्टेशनला धडक देत या घटनेच्या तपासाबाबत पोलीस प्रशासनाला जाब विचारला. तसेच पीडित कुटुंबीयांच्या पूर्णपणे खंबीर पाठीशी असल्याचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सांगितले.
दरम्यान पुढील आठवड्यात माजी खासदार विनायक राऊत सदर परिवाराची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करणार आहेत. तसेच मयत प्रिया चव्हाण यांना न्याय मिळवून देण्यासाठी सिंधुदुर्गातील सर्व शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते यांनी खंबीरपणे स्व. प्रिया चव्हाण कुटुंबीयांच्या पाठीशी असल्याचे देखील बाबुराव धुरी व रुपेश राऊळ यांनी स्पष्ट केले.


