मालवण : छत्रपती शिवरायांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी मालवण येथे उभारलेल्या किल्ले सिंधुदुर्गला युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळाल्यामुळे या आनंदात तमाम मालवणकर सहभागी होत मालवण बंदर जेटी या ठिकाणी किल्ले सिंधुदुर्गच्या साक्षीनं ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांची आकाशबाजी करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले वैभव असलेले 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले. अद्वितीय वैश्विक मूल्य म्हणून त्यांचा आता समावेश करण्यात आलाय. त्यात महाराष्ट्रातील अकरा किल्ले रायगड, राजगड, प्रतापगड पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी तसेच तामिळनाडूतील एक जिंजी या किल्ल्याचा समावेश आहे. हा उपलब्धीबद्दल प्रशासन व किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणा उत्सव समितीच्या वतीने शिवप्रेमींच्या उपस्थितीत जल्लोष करण्यात आला. यावेळी शिवरायांचा जयघोष करण्यात आला तसेच शिवप्रार्थना झाली.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर,तहसीलदार वर्षा झाल्टे, किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणा उत्सव समितीचे गुरु राणे, जिजय केनवडेकर, पोलिस निरीक्षक मारुती जगताप, बाबा मोंडकर, रविकिरण तोरसकर, शिल्पा खोत, भाऊ सामंत, भालचंद्र राऊत, दाजी सावजी, सुदेश आचरेकर, सूर्यकात फणसेकर, ज्योती तोरसकर, दादा वेंगुर्लेकर, रत्नाकर कोळंबकर, यांसह अन्य शिवप्रेमी उपस्थित होते.
निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तमाम शिवप्रेमींना आज आनंद झाला आहे. विशेष आनंद हा आहे की सिंधुदुर्ग जिल्हा हा आपला पर्यटन जिल्हा आहे आणि या जिल्ह्यातील विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग हे दोन किल्ले युनोस्कोच्या यादीत समाविष्ट झाले आहेत.
अतुल काळसेकर म्हणाले पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत भारतीय नौदल दिन या ठिकाणी साजरा झाला. आज सिंधुदुर्ग किल्ला जागतिक नकाशा वरती आला युनोस्कोने आपल्या यादित समाविष्ट करून यावर शिक्कामोर्तब केले.


