Sunday, November 9, 2025

Buy now

spot_img

‘’आज एका समर्पित जीवनाचा अंत..!’’ : आ. दीपक केसरकर यांच्या विकासभाई यांच्याबद्दल भावना.

सावंतवाडी : महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री कै. भाईसाहेब सावंत यांचे सुपुत्र विकास सावंत यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. शिखर बँकेचे उपाध्यक्ष, जिल्हा बँकेचे संचालक तसेच जिल्हा परिषदेचे सभापती म्हणून त्यांनी फार मोठे कार्य केले होते. विशेषतः भाईसाहेबांचा शिक्षणाचा वारसा त्यांनी समर्थपणे सांभाळला. आपल्या सर्व शैक्षणिक संस्थांना त्यांनी एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. शाळा हाच त्यांचा ध्यास होता. त्यांच्या निधनाने ‘एका समर्पित जीवनाचा’ अंत झाल्याची भावना माजी शालेय शिक्षण मंत्री आ. दीपक केसरकर यांनी व्यक्त केली.

सावंतवाडी येथील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना केसरकर यांनी सावंत कुटुंबाशी असलेल्या त्यांच्या निकटच्या व कौटुंबिक संबंधांना उजाळा दिला. विकास सावंत यांच्या कार्याला उजाळा देत त्यांच्या स्मृतींना आदरांजली वाहिली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, विधानसभा मतदारसंघ प्रमुख प्रेमानंद देसाई यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

आ. केसरकर म्हणाले, कै. भाईसाहेब सावंत आणि विकास सावंत यांच्याशी आपले अत्यंत निकटचे व कौटुंबिक संबंध होते. विकास सावंत यांनी कधीही मंत्र्यांचा मुलगा असल्याचा बडेजाव केला नाही. ते एक साधे आणि समर्पित जीवन जगले. मात्र, अवेळी त्यांचे निधन झाले. त्यांच्या कार्याची या जिल्ह्याला गरज होती. विकास सावंत यांचा मुलगा विक्रांत सावंत याची भेट घेऊन त्याचे सांत्वन करणार असल्याचे सांगत त्याने आपल्या वडीलांचा वारसा समर्थपणे चालवावा. यासाठी आपण त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहू, असे आश्वासनही त्यांनी दिले.

वाढदिवसाचे सर्व कार्यक्रम रद्द- 

दरम्यान, मतदारसंघातील जनतेचे माझ्यावर निश्चितच भरपूर प्रेम आहे. त्यामुळे त्यांच्या सदिच्छा नेहमीच माझ्या पाठीशी आहेत. म्हणूनच तब्बल चार वेळा त्यांनी मला आतापर्यंत आमदार म्हणून निवडून दिले. या दुःखद प्रसंगी मी त्यांच्या सदिच्छांचा स्वीकार करू शकत नाही असे स्पष्ट करीत वाढदिवसाचे सर्व कार्यक्रम रद्द केल्याचे जाहीर केले. पुढील काळात गावागावात जाऊन जनतेसाठी वेळ देणार असल्याचे आणि सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ले या तिन्ही तालुक्यांमध्ये एका शासकीय कार्यालयात बसून जनतेची भेट घेऊन त्यांच्या प्रश्नांचे निराकरण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. ‘माझे पुढील सर्व जीवन हे जनतेसाठी समर्पित आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.

कोकणात पुढील काळात जास्तीत जास्त गुंतवणूक आणण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी काही परदेशी कंपन्यांबरोबरही बोलणी सुरू आहेत. माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांचे या जिल्ह्यावर पूर्ण लक्ष आहे. पालकमंत्री नितेश राणे हे जिल्ह्याच्या विकासासाठी अहोरात्र झटत आहेत. आमदार निलेश राणे यांचेही वेळोवेळी सहकार्य लाभत आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे कोकणावर विशेष प्रेम असल्याने भविष्यकाळात कोकण एका वेगळ्या दिशेने वाटचाल करेल असा विश्वासही व्यक्त केला. तर शक्तिपीठ महामार्गाबाबत कोल्हापूरचे प्रश्न वेगळे आहेत. तेथील शेतकऱ्यांना जमिनीचे भाव वाढवून हवे आहेत.

तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ज्या भागात शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते. तो भाग वगळून आता नव्या जागेतून हा महामार्ग नेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हा महामार्ग रेडी बंदराला जोडला जावा आणि मुंबई-गोवा महामार्गालाही जोडण्यात यावा, यासाठी प्रयत्नशील असून त्या दृष्टीने नवीन सर्वे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान न होता. समृद्धीचा हा शक्तिपीठ महामार्ग होण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles