शिरोडा : गेल्या काही वर्षात कर्करोगाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झालेली असून बऱ्याच वेळी उशिरा निदान झाल्याने, कर्करोगामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. याला प्रतिबंध घालण्यासाठी व कर्करोगाचे निदान ग्रामीण भागात लवकर होऊन त्या संबंधित त्वरित उपचार मिळावेत या उद्देशाने आरोग्य सेवा महाराष्ट्र शासन मार्फत “मोबाईल कॅन्सर निदान व्हॅन” जिल्ह्यात दाखल झाली असून शनिवार दिनांक १९ जुलै २०२५ रोजी उपजिल्हा रुग्णालय शिरोडा(ता.वेंगुर्ले)येथे सकाळी ९:०० ते सायंकाळी ४ :०० वाजता तज्ञ डॉक्टरांसह उपलब्ध असणार आहे.
सदरील व्हॅन मध्ये सेवा देण्यासाठी, स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. शेटकर, दंतशल्य चिकित्सक डॉ. मणेर, तसेच नर्सिंग कर्मचारी उपलब्ध असणार आहेत.
सदरील सेवेमध्ये मुखाचा कर्करोग,स्तनाचा कर्करोग व गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग निदान करण्यासाठी तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग निदान साठी pap smear व VIA तपासणी,मुखाचा कर्करोग व स्तनाचा कर्करोग निदान करण्यासाठी बायोस्पी घेण्यात येणार असून, हिमोग्लोबीन व कॅन्सर मार्कर तपासणी ही सुद्धा केली जाणार आहे.
तपासणीत निदान झालेल्या रुग्णांना शासनामार्फत डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात उपचारासाठी पुढील काळात संदर्भित केले जाणार आहे.
तसेच रुग्णांचे रक्तदाब ,ब्लडशुगर तपासणी व आयुष्यमान कार्ड ही काढले जाणार आहेत.
तरी नागरिकांनी तसेच लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रवीण देसाई यांनी केले आहे.


