वेंगुर्ला : महाराष्ट्रात कोकण बोर्ड सुरू झाल्यापासून गेल्या चौदा वर्षात कोकण बोर्डच अव्वल येत आहे. परंतु दहावी बारावी मध्ये अव्वल गुणांनी पास होणारी कोकणातील ही मुले पुढे जाऊन शासकीय अधिकारी का बनत नाहीत..? हा सर्वात मोठा प्रश्न प्रत्येकाच्या मनाला पडलेला असतो. कोकणातील या मुलांना शासकीय अधिकारी बनण्यासाठी द्यावयाच्या स्पर्धा परीक्षा बाबत योग्य ते मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने मालवणचो कट्टो प्रतिष्ठान मुंबई या संस्थेने तिमिरातून तेजाकडे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भारत सरकारच्या सीमाशुल्क विभागात कनिष्ठ अनुवाद अधिकारी म्हणून मुंबई येथे कार्यरत असलेले आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र सत्यवान यशवंत रेडकर यांचे यूपीएससी व एमपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षांसाठीचे मार्गदर्शनपर व्याख्यान शनिवार दिनांक १९ जुलै रोजी सकाळी ११.३० वाजता वेंगुर्ला येथील बॅरिस्टर खर्डेकर महाविद्यालयात आयोजित केले होते.

बॅरिस्टर खर्डेकर महाविद्यालयाने देखील आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली. बॅरिस्टर खर्डेकर महाविद्यालयाच्या जवळपास १५०/१६० विद्यार्थ्यांनी या व्याख्यानाचा लाभ घेतला. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य श्री माने सर, प्रमुख पाहुणे लेखक कवी व मालवणचो कट्टो प्रतिष्ठानचे सदस्य कवी दीपक पटेकर किरण पार्सेकर, प्रा. शितोळे सर आदी मान्यवर उपस्थित होते.

“जिथे उभा राहीन तिथे चिंतन, जिथे मार्गदर्शन करेन तिथे परिवर्तन!” – सत्यवान रेडकर यांचे बोध वाक्य.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुले दहावी बारावीत बोर्डात येतात, कोकण बोर्ड अव्वल असते, मग पुढे हीच मुले शासकीय अधिकारी का बनत नाहीत..? त्याचं नक्की घोडं कुठे अडतं..? असे प्रश्न उपस्थित करत मुलांच्या बुद्धिमत्तेची चाचणी घेत श्री रेडकर यांनी कोणतेही टेन्शन न घेता हसत खेळत व्याख्यान ऐका, आवश्यक ते मुद्दे लिहून घ्या असे सांगून मुलांना आपला दूरध्वनी क्रमांक देऊन केव्हाही गरज पडेल तेव्हा आपल्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करा, आपण केव्हाही मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध असेन अशी ग्वाही दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आपण सुपुत्र आहे त्यामुळे कोकणातील मुलांसाठी मी सदैव मार्गदर्शन करण्यास तत्पर आहे. आपल्या ज्ञानाचा फायदा आपल्या कोकणी मुलांना झाला पाहिजे. यासाठीच शनिवार रविवार मुंबई येथून गावात येऊन मुलांना निःशुल्क मार्गदर्शन करत आहे असे सांगून जिथे उभा राहीन तिथे चिंतन, जिथे मार्गदर्शन करेन तिथे परिवर्तन घडेल असाही त्यांनी विश्वास व्यक्त केला.
यावेळी विद्यार्थ्यांना त्यांनी काही प्रश्न विचारले त्यावर क्वचित प्रसंगी उत्तर आलं, त्यामुळे त्यांनी मुलांच्या सामान्य ज्ञानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून दररोज पेपर वाचणे, पाचवी ते बारावी पर्यंतची वेगवेगळ्या विषयांची पुस्तके वाचणे, तीस पर्यंतचे पाढे पाठ करणे, पुढचे पाठ मागचे सपाट अशी परिस्थिती नको आणि आजपासूनच आपल्या भविष्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले. दहावी पासून पदवी, पदवीत्तर कोणत्याही शाखेतून शिक्षण घेतलेल्या प्रत्येकाला स्पर्धा परीक्षांना सामोरे जाऊन शासकीय अधिकारी होते येते. कोणत्याही शाखेतील पदवीधर विद्यार्थी स्पर्धा परीक्षा पास होऊन कलेक्टर, आयपीएस अधिकारी, बँक अधिकारी, वन अधिकारी होऊ शकतो असा आत्मविश्वास मुलांमध्ये जागृत केला. केवळ पुस्तकी ज्ञान, मोबाईल, क्रिकेटचे सामने आणि राजकीय पक्षांचे झेंडे घेऊन न फिरता, कुठल्याही अकादमी मध्ये पैसे न खर्च करता स्वअध्ययन करून स्पर्धा परीक्षा पास होता येतात केवळ यासाठी आपल्यामध्ये जिद्द हवी असेही त्यांनी पुढे बोलताना सांगितले. तब्बल दोन तासापेक्षा अधिक वेळ चाललेल्या व्याख्यानाला विद्यार्थ्यांचा देखील उत्तम प्रतिसाद लाभला. खर्डेकर महाविद्यालयाने देखील व्याख्यानासाठी उत्तम नियोजन केले होते.
तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. महाविद्यालयाच्या वतीने श्री.सत्यवान यशवंत रेडकर हे वेळतवेळ काढून खास मुंबईहून व्याख्यानासाठी उपस्थित राहिल्याबद्दल व महाविद्यालयात कार्यक्रमाचे नियोजन केल्याबद्दल मालवणचो कट्टो प्रतिष्ठानच्या श्री.किरण पार्सेकर यांचा पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्र.प्राचार्य माने सरांनी केले. आभार प्रदर्शन श्री शितोळे सरांनी, सूत्रसंचालन प्रा.गिरी यांनी केले तर पाहुण्यांची ओळख सौ.रश्मी कांबळी यांनी केली.
मालवणचो कट्टो प्रतिष्ठान, मुंबई कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात विविध उपक्रम राबवित असते. रक्तदान, वृद्धाश्रम अनाथाश्रम आदींना मदत, युवाईला क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देणे, गावातील शाळांमध्ये विविध स्पर्धा आयोजित करणे, पूरग्रस्तांना तातडीची मदत पुरविणे अशाप्रकारे विविध प्रकारे “सहकारातून सदाचार” हे ब्रीद घेऊन मालवणचो कट्टो प्रतिष्ठान कार्य करत असते. यावेळी शैक्षणिक उपक्रमांतर्गत कट्ट्याचे सदस्य श्री. किरण पार्सेकर यांच्या संकल्पनेतून श्री.सत्यवान रेडकर यांचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यान आयोजित करून एक पाऊल शैक्षणिक वाटचालीकडे टाकले असून भविष्यातही जिल्ह्यातील इतर शाळा, महाविद्यालयांमध्ये अशाप्रकारे शैक्षणिक उपक्रम घेण्यात येईल अशी मालवणचो कट्टो प्रतिष्ठानने माहिती दिली. यावेळी मालवणचो कट्टो प्रतिष्ठान तर्फे सदस्य कवी दीपक पटेकर, सावंतवाडी यांनी प्रतिष्ठानच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेतला आणि बॅरिस्टर खर्डेकर महाविद्यालयाने केलेल्या सहकार्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य आणि इतर प्राध्यापक वर्गाचे तसेच आपल्या विनंतीला मान देऊन व्याख्यानासाठी उपलब्ध झालेल्या श्री.सत्यवान रेडकर यांचे ही ऋण व्यक्त केले. यावेळी मालवणचो कट्टो प्रतिष्ठानच्या वतीने महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य श्री माने सर यांचे व श्री.सत्यवान रेडकर यांचा शाल श्रीफळ व छ.शिवाजी महाराजांची मूर्ती भेट देत सन्मान करण्यात आला.
हा शैक्षणिक उपक्रम यशस्वी होण्यासाठी मालवणचो कट्टो प्रतिष्ठानचे मुंबई येथील अध्यक्ष सुधीर कांदळकर, सदस्य राम वेंगुर्लेकर, स्वाती चौकेकर आदी अनेक सदस्यांनी विशेष प्रयत्न केले. या कार्यक्रमासाठी मालवणचो कट्टो प्रतिष्ठानचे सदस्य परेश परब पिंगुळी, गजानन घाडी, वेळकर फाऊंडेशन चे महादेव वेळकर, सुवर्णा वायंगणकर, महाविद्यालयाचे प्राध्यापक, देसाई सर , जाधव मॅडम शिक्षकेतर कर्मचारी, पालक उपस्थित होते.


