वैभववाडी / धाराशिव : कार्यकर्ता हा संस्थेचा महत्त्वाचा घटक असून संस्थेमुळे कार्यकर्त्याला ओळख मिळते. संस्था आहे म्हणून कार्यकर्ता आहे याची जाणीव कार्यकर्त्यांनी ठेवून संस्थेच्या ध्येय धोरणाप्रमाणे अपेक्षित कार्य करावे असे आवाहन ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे राज्याध्यक्ष डॉ.विजय लाड यांनी संस्थेच्या धाराशिव येथील दोन दिवशीय राज्य अधिवेशनाच्या समारोप प्रसंगी अध्यक्षीय भाषणात केले. ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे दोन दिवसीय राज्य अधिवेशन दि.१९ आणि २० जुलै २०२५ रोजी राज्याध्यक्ष डॉ. विजय लाड यांच्या अध्यक्षतेखाली श्री गणेश मंगल कार्यालय धाराशिव येथे संपन्न झाले.

यावेळी व्यासपीठावर या कार्यक्रमाचे उद्घाटन व प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर म.न.पा.चे अतिरिक्त आयुक्त रवी पवार, मा.आमदार कैलास पाटील, माजी जि.प.अध्यक्षा अस्मिताताई कांबळे, संस्थेचे राज्य संघटक श्री.सर्जेराव जाधव, सचिव श्री.अरुण वाघमारे, सहसंघटिका मेधाताई कुलकर्णी, कोषाध्यक्षा सुनीताराजे घाटगे, सहसचिव प्रा.सुरेश पाटील, सदस्य श्री.प्रमोद कुलकर्णी, मराठवाडा विभाग अध्यक्ष सतीश माने, संघटक प्रा.हेमंत वडणे, श्री.बालाजी लांडगे, धाराशिव अध्यक्ष अजित बागडे व सचिव आशिष बाबर आदी मान्यवर उपस्थित होते.
ग्राहक चळवळीचे अधिष्ठान स्वामी विवेकानंद, ग्राहक चळवळीचे प्रणेते बिंदुमाधव जोशी आणि महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
स्वागत गीत आणि ग्राहक गीत सादर करण्यात आले.
ग्राहक राजा असून ग्राहकांच्या हक्कासाठी कार्य करणारी ग्राहक पंचायत महाराष्ट्र ही संस्था आहे. या संस्थेचे कार्य आदर्शवत व प्रेरणादायी असे आहे असे रवी पवार यांनी उद्घाटनपर मनोगतात व्यक्त केले. सर्वसामान्य ग्राहकांचे प्रश्न घेऊन निस्वार्थी वृत्तीने काम करणारी ही संस्था आहे.
संस्थेच्या कार्याला आणि पुढील वाटचालीला आमदार कैलास पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.
ग्राहक केंद्रबिंदू मानून काम करणारी ग्राहक पंचायत ही एकमेव संस्था आहे. संस्थेने अनेक कामे केली आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहून विचार व्यक्त करण्याची संधी दिल्याबद्दल अस्मिताताई कांबळे यांनी आयोजकांचे आभार व्यक्त केले.या उद्घाटनपर कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे राज्यसचिव श्री. अरुण वाघमारे यांनी केले. या दोन दिवशीय राज्यस्तरीय अधिवेशनात वीज वितरण व्यवस्थेत सोलर सिस्टिमचे महत्व- संजय अडे, ग्राहक संरक्षण कायद्यातील बदल-ॲड. श्रद्धा बहिरट, कार्यकर्ता पद आणि जबाबदारी- प्रा.सुरेश पाटील, रुग्ण ग्राहक- डॉ.अजय सोनवणे, शेतकरी ग्राहक प्रबोधन- श्री.सर्जेराव जाधव, चिंतन-पद्मनाभ व्यास, ग्राहक संरक्षण परिषद सदस्यांची जबाबदारी- श्री.अरुण वाघमारे, रेरा कायदा व ग्राहक- श्री.राधेश्याम तापडिया, व्यवस्था परिवर्तनाची लढाई- श्री. श्यामकांत पात्रीकर, संस्था तत्त्वज्ञान व कार्यपद्धती- मेधाताई कुलकर्णी आणि ग्राहक चळवळ- ॲड. शिरीष देशपांडे आदी मान्यवरांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. या अधिवेशनात विभागनिहाय पंचप्राण पुरस्कार व उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कोकण विभागाचा शेतकरी पंचप्राण पुरस्कार-२०२५ रत्नागिरीचे शेतकरी श्री. संजय सुरेश शिगवण व कोकण विभागाचा उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार-२०२५ सिंधुदुर्ग मालवणचे कार्यकर्ते श्री.रत्नाकर कोळंबकर यांना देऊन सन्मानित करण्यात आले.
त्या अधिवेशनाला कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातून प्रा. सुरेश पाटील, श्री.विष्णुप्रसाद दळवी, श्री.संजय पाटील,श्रीम. सुगंधा देवरुखकर, श्रीम.गीतांजली कामत, प्रा. विनायक पाताडे, श्री.कुबेर भोजे, श्री.रत्नाकर कोळंबकर प्रा.अजित कानशिडे रत्नागिरी जिल्ह्यातून श्री.संदेश सावंत, श्री.आशिष भालेकर, श्री.दीपक साळवी, श्री.संजय शिगवण आणि मुंबई येथून श्रीम.प्रणिता वैराळ आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
या दोन दिवशीय राज्य अधिवेशनासाठी राज्यभरातून ३५० कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राज्य कार्यकारिणी, मराठवाडा विभाग कार्यकारिणी आणि धाराशिव जिल्हा कार्यकारिणी यांनी विशेष परिश्रम घेतले.


