चिंतन –
केवळ शासकीयच नव्हे तर खाजगी नोकऱ्या देखील कमी होत चालल्याने असेल कदाचित राज्यकर्ते, नेते, विद्वान, तरुणांना ”नोकऱ्या मागणाऱ्यापेक्षा नोकऱ्या देणारे व्हा..!”, असा संदेश तरुणांना ऐकवू लागले. बऱ्याच तरुणांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून किंवा परिस्थितीच्या रेट्यामुळे मालक होण्याचे मार्ग चोखाळायला सुरुवात केली.
अगदी स्टार्टअप पासून ते गल्ली बोळात टपऱ्या टाकून कुणी दुकानदारी , गॅरेजेस , किरकोळ दुरुस्तीची दुकाने सुरू केली. एका दृष्टीने हे बरेच झाले परंतु या गल्ली बोळातील छोटे छोटे दुकानदार असलेल्या मालकांच्या डोक्यात मालकपणाची हवा गेली आहे की काय असे वाटावे अशी परिस्थिती आहे.
एका छोट्या दुकानात गेलो असता , त्या दुकानाचा मालक म्हणविणारा तरुण मोबाईल मध्ये क्रिकेट मॅच पहात होता मला पेन , पेन्सिल व काही कागद पाहिजे होते . पण तो दुकानदार माझ्याकडे पाहिले न पाहिल्या सारखे करून म्हणाला थांबा नोकर बाहेर गेला आहे . वास्तविक त्याने स्वतः उठून द्यायला हरकत नव्हती पण तो मालक होता ना !
असाच अनुभव एका गॅरेजमध्ये आला माझी गाडी पंक्चर झाली होती . तेथेही त्या गॅरेजच्या मालकाने त्याचा नोकर नसल्याने पंक्चर काढण्याविषयी असमर्थता व्यक्त केली वास्तविक तेथे पंक्चरचे सर्व सामान होते. मालक निवांत होता फारसे गिऱ्हाईकही नव्हते तरीही त्याच्या मालकपणामुळे त्याला हे काम करणे कमीपणाचे वाटत असावे . जर त्याने पंक्चर काढली असती तर त्याला ५० रुपये मिळाले असते आणि त्यासाठी केवळ १५ मिनिटे लागली असती .
आम्ही ज्या भागात राहतो तेथे मोठी दुकाने कमी आहेत व बहुतेक सर्व छोटे दुकानदार आहेत त्यामध्ये अगदी गॅस रिपेअर , स्टेशनरी , किराणा , मेडिकल, छोटी डेअरी इ . हि सर्व दुपारी १ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत बंद असतात . खरे तर हे सर्व छोटे दुकानदार आहेत तरीही जणू काही आपण पुण्यातील चितळे बंधू आहोत अशा अविर्भावात दुकाने बंद ठेवतात . या मालकांना असे वाटत नाही की, आपण दुकान जास्त वेळ चालू ठेवावे पैसा जास्त मिळवावा . मोठया दुकानदारांचे ठीक आहे पण हे छोटे नवमालक दुकानदार किंवा व्यावसायिक देखील मालकपणाच्या तोऱ्यातून बाहेर पडायला तयार नाहीत .
ही छोटी मोठी दुकाने फार मोठी मिळकतीची ठिकाणे नाहीत तरीही आपला व्यवसाय नेटाने चालावा आपण स्वतः कामात झोकून द्यावे असे या मालकांना वाटत नाही . वास्तविक या मालकांनी आपल्या मालकपणाच्या भूमिकेतून बाहेर येवून आपल्या नोकरांसोबत सहकाऱ्या प्रमाणेच काम करायला हवे तरच व्यवसायाला उर्जितावस्था प्राप्त होईल . अन्यथा या स्पर्धेच्या युगामध्ये आपण कधी बाहेर फेकलो जाऊ हे लक्षातही येणार नाही .
– डॉ. ह. ना. जगताप


