सावंतवाडी : येथील मिलाग्रीस हायस्कूलमध्ये नुकतेच पालक दिनाचे आयोजन करण्यात आले. ‘पेरेंट्स – अवर होप अँड जॉय’ या थीमनुसार या कार्यक्रमात पालकांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून धोंडी कारिवडेकर व सौ. शुभांगी कारिवडेकर उपस्थित होते.
ईशस्तवन व दीप प्रज्ज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदाना यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. दहावीमधील विद्यार्थिनी कु. तनया सावंत हिने आपले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या बहारदार नृत्याने कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढवली. पालकांसाठी विशेष गेम्स व स्पॉट प्राईजचे देखील आयोजन करण्यात आले होते. इयत्ता दहावीतील सर्व विद्यार्थ्यांचे पालकांचे आपापल्या पाल्याच्या हस्ते शुभेच्छा कार्ड देऊन व आपल्या पाल्यासोबत सेल्फी घेऊन शुभेच्छा देण्यात आल्या. पालक व विद्यार्थी यांचे दृढ नातेसंबंध अधिक दृढ व्हावे विद्यार्थ्यांवर होणाऱ्या संस्कारांमध्ये असणारे पालकांच्या अमूल्य अशा योगदानाची पाल्यांना जाणीव व्हावी, यासाठी हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीतील कु. कृष्णा पास्ते व कु. श्रुती राऊळ यांनी केले. यावेळी इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांचे सर्व पालक, प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदाना, हायस्कूल पर्यवेक्षिका श्रीम. संध्या मुणगेकर व इतर शिक्षक उपस्थित होते.


