सेंट किट्स : ऑस्ट्रेलियाचा ऑलराउंडर आणि आयपीएलमध्ये आरसीबीसाठी खेळणाऱ्या टीम डेव्हिड याने वेस्ट इंडिज विरूद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम टी 20i सामन्यात विस्फोटक शतकी खेळी करत अनेक विक्रम उद्धवस्त केले. विंडीज विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 26 जुलैला हा सामना खेळवण्यात आला. टीमने या सामन्यातील दुसऱ्या डावात विजयी धावांचा पाठलाग करताना झंझावाती खेळी केली. टीमने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 215 धावांचं आव्हान हे 23 चेंडूंआधी 4 विकेट्स गमावून सहज पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियाने यासह टेस्टनंतर टी 20i सरिजही 3-0 अशा एकतर्फी फरकाने आपल्या नावावर केली.
टीम डेव्हीडची वादळी शतकी खेळी, अनेक रेकॉर्ड ब्रेक –
टीम डेव्हिड याने पाचव्या स्थानी बॅटिंगसाठी येत शतक झळकावलं. टीमने 37 चेंडूत नाबाद 275.68 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 102 धावांची खेळी केली. विशेष म्हणजे टीमने फक्त चौकार आणि षटकारांच्या मदतीने 17 चेंडूत 90 धावा केल्या. टीमने या शतकी खेळीत 11 षटकार आणि 6 चौकार लगावले. टीम यासह ऑस्ट्रेलियासाठी वेगवान शतक करणारा पहिला फलंदाज ठरला. टीमने याबाबत जोश इंग्लिस याचा रेकॉर्ड ब्रेक केला. जोशने 2024 साली स्कॉटलँड विरुद्ध 43 चेंडूत शतक केलं होतं.
मार्कस स्टोइनिसचा विक्रम उद्धवस्त –
टीमने त्याआधी अवघ्या 16 चेंडूत अर्धशतक झळकावलं. टीम यासह मार्कस स्टोइनिस याला पछाडत ऑस्ट्रेलियासाठी वेगवान अर्धशतक करणारा पहिला फलंदाज ठरला. स्टोयनिसने 2022 च्या टी 20i वर्ल्ड कपमध्ये 17 चेंडूत अर्धशतक केलं होतं.
तसेच टीमने 11 षटकारांसह ख्रिस गेल, रोहित शर्मा यांच्यासह अनेक फलंदाजांना मागे टाकलं. टीमने ख्रिस गेल, रोहित शर्मा आणि अनेक फलंदाजांचा टी 20i सामन्यातील एका डावात 10 षटकारांचा विक्रम मोडीत काढला. एका टी 20i सामन्यात सर्वाधिक 18 षटकारांचा विक्रम हा साहिल चौहान याच्या नावावर आहे.
रोहित शर्माचा रेकॉर्ड कायम –
दरम्यान टीम डेव्हीडने शतक केलं. मात्र तो रोहित शर्माचा रेकॉर्ड ब्रेक करण्यात अपयशी ठरला. टीमने 3 चेंडूंआधी शतत पूर्ण केलं असतं तर रोहितचा रेकॉर्ड ब्रेक झाला असता. रोहितने 2017 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 35 चेंडूत शतक केलं होतं.


