मॉस्को : रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबायचे नाव घेत नाहीये. दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ले सुरु आहेत. अशातच आता युक्रेनच्या ड्रोनने रशियाची चिंता वाढवली आहे. युक्रेनियन सैन्याने आज रशियाच्या स्टॅव्ह्रोपोल प्रदेशात ड्रोनने हल्ला केला. रशियाच्या इलेक्ट्रॉनिक वॉर मशीन प्लांटला या हल्ल्याद्वारे लक्ष्य करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. युक्रेनच्या सीमेपासून सुमारे 540 किलोमीटर अंतरावर हा हल्ला झाला आहे. युक्रेनच्या या हल्ल्यात स्टॅव्ह्रोपोल शहरातील सिग्नल सिस्टमचे मोठे नुकसान झाले आहे. या हल्ल्याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहे. ज्यात एक ड्रोन हवेतून येतो आणि एका इमारतीवर आदळतो. यानंतर मोठा स्पोट होतो आणि सगळीकडे जाळ आणि घूर पसरतो.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, या इमारतीत इलेक्ट्रॉनिक वॉर मशीन प्लांट आहे. यात रडार, रेडिओ नेव्हिगेशन उपकरणे आणि रिमोट कंट्रोल रेडिओ उपकरणे तयार केली जातात. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार या हल्ल्यासाठी लांब पल्ल्याचे एसबीयू ड्रोन वापरण्यात आले होते. या हल्ल्यामुळे रशियाकडून होणारे हल्ले कमी होतील आणि रशियाची लष्करी क्षमता कमी होईल अशी युक्रेनला आशा आहे. आगामी काळातही असे हल्ले सुरु राहणार असल्याची माहिती यु्क्रेनियन अधिकाऱ्यांनी दिली आहे.
रशियाकडून प्रतिक्रिया नाही –
युक्रेनने केलेल्या या हल्ल्यावर रशियाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. रॉयटर्सच्या अहवालानुसार रशियन संरक्षण मंत्रालयाला प्रतिक्रियेबाबत विचारण्यात आले होते, मात्र मंत्रायलाकडून याबाबत कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. दरम्यान फेब्रुवारी 2022 पासून हे युद्ध सुरु आहे, या काळात दोन्ही देशांकडून सतत एकमेकांवर हल्ले सुरु आहेत.
युक्रेनकडून ड्रोन क्षमता वाढवण्यावर भर –
युक्रेन हा देश युद्धापूर्वी ड्रोन बनवत नव्हता. मात्र युद्ध सुरु झाल्यानंतर युक्रेनने ड्रोन उद्योगावर लक्ष केंद्रित केले आहे. युक्रेन आता लांब पल्ल्याचे ड्रोन बनवण्याची क्षमता वाढवत असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच अमेरिका आणि इतर देशांकडून युक्रेनला मदत देखील केली जात आहे. त्यामुळे आता युक्रेनची ताकद दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.


