व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. आता या लोकप्रिय मेसेजिंग अॅपवर असे फीचर्स येत आहेत जे तुमच्या युजर अनुभवात बदल घडवतील. आजवर केवळ खासगी मेसेजिंगसाठी ओळखले जाणारे WhatsApp आता जाहिरात प्लॅटफॉर्म बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. ज्याचा अंदाज अनेकांनी आधीच लावला होता, आता त्याचीच अधिकृत सुरुवात होताना दिसतेय.
काय आहे Status Ads फीचर?
नवीन फीचरनुसार, आता व्हॉट्सअॅपच्या ‘Status’ सेक्शनमध्ये जाहिराती दिसणार आहेत, जशा Instagram Stories मध्ये असतात. या जाहिराती खास करून बिझनेस अकाउंट्सकडून पोस्ट केल्या जातील आणि त्यांना ‘Sponsored’ असं लेबल दिलं जाईल, जेणेकरून वापरकर्त्यांना लगेच समजेल की हा जाहिरातीचा कंटेंट आहे. हे Ads तुमच्या मित्रपरिवाराच्या स्टेटस दरम्यान दिसतील, जे काहींना त्रासदायक वाटू शकतं.
जर एखादा यूजर एखाद्या स्पॉन्सर्ड जाहिरातदाराचा कंटेंट बघायला इच्छुक नसेल, तर तो त्या जाहिरातदाराला ब्लॉक देखील करू शकतो. म्हणजे यूजर्सकडे कंट्रोल असेल की कोणत्या जाहिराती बघायच्या आणि कोणत्या नाही.
Meta कंपनीने नुकत्याच लॉन्च केलेल्या Android बीटा अपडेट (वर्जन 2.25.21.11) मध्ये दोन नवे फीचर्स आणले आहेत Status Ads आणि Promoted Channels. सध्या हे फीचर्स काही निवडक बीटा युजर्ससाठीच उपलब्ध आहेत, पण लवकरच ते सर्व युजर्सपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
Promoted Channels –
दुसरं मोठं फीचर म्हणजे Promoted Channels. यामध्ये एखादा ब्रँड किंवा कंटेंट क्रिएटर आपला चॅनेल प्रमोट करू शकतो. असं केल्यास त्यांच्या चॅनेलला WhatsApp च्या ‘Channel Directory’ मध्ये वरची जागा मिळेल. हे देखील ‘Sponsored’ टॅगसह असेल. हा बदल त्यांच्यासाठी उपयुक्त आहे जे लवकर जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचू इच्छितात.
प्रायव्हसीला धक्का?
मेटाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे की हे दोन्ही फीचर्स वापरकर्त्याच्या प्रायव्हसीवर परिणाम करणार नाहीत. जाहिराती फक्त ‘Status’ आणि ‘Channels’ या पब्लिक सेक्शनमध्ये दिसतील. वैयक्तिक चॅट्स किंवा ग्रुप्समध्ये कोणतीही जाहिरात दाखवली जाणार नाही. म्हणजेच तुमचे मेसेजिंग अनुभव जाहिरातींपासून मुक्त राहतील, असं कंपनीने सांगितलंय.
याशिवाय, Meta एक नवीन फीचर टेस्ट करत आहे ज्यात युजर्सना त्यांचा Ad Activity Report डाउनलोड करता येईल. यात दाखवलं जाईल की कोणत्या जाहिराती कधी आणि कुणाकडून दाखवण्यात आल्या. यामुळे जाहिरात व्यवस्थापन अधिक पारदर्शक होईल.
व्हॉट्सअॅपवर जाहिराती दाखवण्याची चर्चा 2019 पासून सुरु होती. पण यावर कंपनीने काही वेळ गप्प राहिल्यानंतर, आता प्रत्यक्षात अंमलबजावणी करत आहे. हे अपडेट स्पष्ट करतं की WhatsApp आता फक्त मेसेजिंग अॅप राहिलेलं नाही, तर Meta साठी मोठा जाहिरात माध्यम बनत चाललंय जिथून कंपन्या आणि क्रिएटर्स दोघेही कमाई करू शकतील.
थोडक्यात सांगायचं झालं, तर…
WhatsApp आता तुमच्या स्टेटस दरम्यान जाहिराती आणत आहे आणि ब्रँड्सना चॅनेल प्रमोट करण्याची मुभा देत आहे. जरी हे बदल काही युजर्ससाठी त्रासदायक ठरू शकतात, तरीही Meta ने याची काळजी घेतली आहे की प्रायव्हसीला बाधा पोहोचणार नाही. मात्र यामुळे WhatsApp च्या ‘क्लीन आणि अॅड-फ्री’ इमेजला काही प्रमाणात तडा जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.


