Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

सुप्रसिद्ध साहित्यिक कै. जयवंत दळवी जन्मशताब्दी सांगता सोहळा १४ ऑगस्ट रोजी आरवलीत. ; माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, स्व. दळवींचे सुपुत्र गिरीश दळवी यांसह दिग्गज मान्यवरांची लाभणार उपस्थिती.

वेंगुर्ला : सुप्रसिद्ध साहित्यिक कै.जयवंत दळवी जन्मशताब्दी सांगता सोहळा गुरुवार दि.१४ ऑगस्ट रोजी त्यांच्या आरवली या जन्मगावी साळगांवकर मंगल कार्यालयात दुपारी ३.३० ते ०७.०० या वेळेत आयोजित करण्यात आला आहे.

आजगाव येथील साहित्य प्रेरणा कट्ट्याच्या अठ्ठावन्नाव्या मासिक कार्यक्रमांतर्गत शिरोडा येथील रघुनाथ गणेश खटखटे ग्रंथालय व दळवी कुटुंबीय यांच्या सहयोगाने आयोजित या सोहळ्यास माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, कै.जयवंत दळवी यांचे सुपुत्र गिरीश दळवी,’संगीत देवबाभळी’ या सध्या गाजत असलेल्या नाटकाचे लेखक तथा दिग्दर्शक प्राजक्त देशमुख व गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष तथा नामवंत वक्ते प्राचार्य अनिल सामंत हे उपस्थित राहणार आहेत.

कै.दळवी यांचा जीवनपट अनोख्या पद्धतीने उलगडणाऱ्या या कार्यक्रमात दळवींच्या साहित्यात आलेल्या त्यांच्या घरातील वस्तू,आरवली परिसरातील वास्तू यांचा मागोवा घेणारा मुंबई येथील राजेश नाईक यांच्या संकल्पनेतून साकारलेला ‘पाऊलखुणा’ हा वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम होणार आहे.

साहित्य प्रेरणा कट्ट्याचे समन्वयक तथा सिधुदुर्गातील नामवंत साहित्यिक विनय सौदागर दिग्दर्शित ‘दळवींचे साहित्य चरित्र’ या कार्यक्रमात दळवींच्या साहित्याचा अभिवाचन व अभिनयाच्या माध्यमातून वेध घेण्यात येणार आहे. गोव्यातील प्रसिद्ध अभिनेत्री उमा प्रभुदेसाई, आजगाव येथील चोखंदळ वाचक सरोज रेडकर, फणसखोल येथील कवी सोमा गावडे, शिरोडा येथील लेखिका स्नेहा नारिंगणेकर, दळवी ज्या शाळेत शिकले त्या जीवन शिक्षण शाळेच्या विद्यमान मुख्याध्यापिका वैभवी राय शिरोडकर, युवा डॉक्टर गणेश मर्ढेकर, गोव्यातील युवा कवयित्री आसावरी भिडे, खास या सोहळ्यासाठी अमेरिकेहून येणाऱ्या नीला इनामदार, तसेच आरवली येथील युवा अभिनेते काशिनाथ मेस्त्री व रवींद्र पणशीकर हे या कार्यक्रमात सहभागी होतील.

‘कौटुंबिक दळवी’ या कार्यक्रमात दळवींचे सुपुत्र गिरीश दळवी व स्नुषा आदिती दळवी यांच्या मुलाखती गोव्यातील प्रसिद्ध साहित्यिक सोनाली परब घेतील. दळवी यांच्या सुकन्या शुभांगी नेरूरकर या दृकश्राव्य फितीद्वारे या कार्यक्रमात व्यक्त होतील.

‘साहित्यापलिकडील दळवी’ या कार्यक्रमात आरवली येथील बांधकाम व्यावसायिक रघुवीर तथा भाई मंत्री, शिरोडा येथील ज्येष्ठ पत्रकार अनिल निखार्गे आणि सावंतवाडी येथील नामवंत लेखक सतीश पाटणकर यांच्या मुलाखती गोव्यातील साहित्यिक प्रा.गजानन मांद्रेकर हे घेतील.

दळवी यांच्या जन्मशताब्दी प्रीत्यर्थ साहित्य प्रेरणा कट्टा व खटखटे ग्रंथालयाने वर्षभर केलेल्या दळवींच्या बत्तीस पुस्तकांचे वाचन व चर्चेसंबंधीचा आढावाही विनय सौदागर या सोहळ्यात घेतील.

केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू,सुप्रसिद्ध नाटककार सतीश आळेकर, नामवंत साहित्यिक मुकुंद टाकसाळे इत्यादींची मनोगते दृकश्राव्य फितीद्वारे या सोहळ्यात दाखविण्यात येणार आहेत.

प्राजक्त देशमुख यांचे होणारे अभिवाचन व सुरेश प्रभू यांचे कै. जयवंत दळवी यांच्या विषयीचे मनोगत हे या सोहळ्याचे खास आकर्षण रहाणार आहे.दळवींच्या साहित्यिक कारकिर्दीचा आढावा घेणाऱ्या प्राचार्य अनिल सामंत यांच्या भाषणाने कै. जयवंत दळवी जन्मशताब्दीची सांगता होईल.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles