सावंतवाडी: होडावडा ग्रामपंचायत येथे केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (NDRF) वतीने आज दिनांक ८ ऑगस्ट २०२५ रोजी आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याबाबत प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. यंदाच्या पावसाळ्यात होडावडा गाव पूरग्रस्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर या प्रशिक्षणाला विशेष महत्त्व होते.
इन्स्पेक्टर आर. जे. यादव यांच्या नेतृत्वाखालील १५ जणांच्या एनडीआरएफ टीमने ग्रामस्थांना सखोल मार्गदर्शन केले. यामध्ये भूकंपपूर्व आणि भूकंपपश्चात घ्यावयाची काळजी, आग व वनव्यासारख्या परिस्थितीत बचाव, सर्पदंश झाल्यास काय करावे आणि विषारी सापांची ओळख, तसेच आपत्कालीन परिस्थितीत घरगुती साहित्याचा वापर करून जीव वाचवण्यासाठीच्या उपाययोजनांबद्दल माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमासाठी वेंगुर्ला तहसीलदार श्री. ओंकार ओतारी यांचे मार्गदर्शन लाभले. या वेळी मंडळ अधिकारी सौ. प्रेरणा गिरप, तलाठी सौ. नेहा गावडे, पोलीस पाटील मनोज होडावडेकर, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. गावकऱ्यांनी या प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, ज्यामुळे कार्यक्रम यशस्वी झाला. या प्रशिक्षणातून आपत्कालीन परिस्थितीत स्वतःचे आणि इतरांचे संरक्षण कसे करावे, याचे महत्त्वाचे धडे ग्रामस्थांना मिळाले.


