बांदा : इन्सुली दशक्रोशीतील शेतकरी आणि ग्रामस्थांनी १९७७ साली अवघ्या तीन रुपये गुंठा दराने १२६ एकर जमीन स्पिनिंग मिलसाठी दिली होती. आता या जागेवर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याची मागणी शेतकरी करत आहेत. स्पिनिंग मिल संघर्ष समितीचे सचिव सूर्या पालव यांनी प्रशासनाकडे ही मागणी केली असून या जागेत भव्य हॉस्पिटल बांधून जिल्हावासियांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती केली आहे.
रोजगार मिळावा म्हणून दिली होती जमीन –
गावातील आणि आसपासच्या युवकांना नोकरीसाठी मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये जावे लागू नये, यासाठी १९७७ मध्ये ही जमीन तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण आणि मंत्री भाईसाहेब सावंत यांच्या उपस्थितीत स्पिनिंग मिलला देण्यात आली होती. काही काळ मिल सुरू राहिली. मात्र, काही कारणांमुळे ती बंद पडली. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.
शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी –
सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्य सुविधांचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. त्यामुळे या जागेत मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उभारल्यास जिल्हावासियांची सोय होईल असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या हॉस्पिटलमध्ये पात्रतेनुसार शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशीही त्यांची मागणी आहे. तसेच या जागेवर रोजगाराभिमुख प्रकल्प आणावा, जेणेकरून परिसरातील तरुणांना रोजगार मिळेल, असे शेतकऱ्यांनी सांगितले.
भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांचा संघर्ष –
अलीकडेच काही धनदांडग्यांकडून ही जमीन खरेदी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप सूर्या पालव यांनी केला आहे. जर कोणी ही जमीन खरेदी करण्याचा विचार करत असेल तर त्यांनी तो करू नये. शेतकरी आणि संपूर्ण गाव या विरोधात संघर्ष करेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. शेतकरी आपल्या जमिनीच्या मोबदल्यात रोजगाराची अपेक्षा करत असून यावर प्रशासनाने सकारात्मक विचार करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
पालकमंत्री ना. नितेश राणे यांचे लक्ष वेधणार ! –
जिल्ह्यात आरोग्याचा प्रश्न गंभीर आहे. रुग्णांना वारंवार गोवा बांबोळी येथे उपचारासाठी पाठविण्यात येते. या प्रश्नासंदर्भात लवकरच पालकमंत्री ना. नितेश राणे यांची भेट घेऊन त्यांना हॉस्पिटल किंवा इतर रोजगाराभिमुख प्रकल्प आणण्याची विनंती केली जाणार असल्याचेही पालव यांनी सांगितले. यावेळी सदस्य नलू मोरजकर, आनंद राणे, संजय राणे, सखाराम बागवे, न्हानू कानसे, महादेव राणे उपस्थित होते.


