सावंतवाडी : धाकोरे येथील रहिवासी आत्माराम नारायण साटेलकर आणि समस्त ग्रामस्थांनी गेल्या अनेक वर्षांपासून अडथळाग्रस्त असलेल्या सार्वजनिक रस्त्यासाठी आज पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आहे. तहसीलदार कार्यालयासमोर हे उपोषण छेडले होते. दुपारपर्यंत अधिकारी वर्गानं कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
होळीचे भाटले ते अशोक साटेलकर आणि तेथून रघुनाथ मुळीक यांच्या घरापर्यंतचा हा ८ फूट रुंदीचा रस्ता अतिक्रमणामुळे पूर्णपणे बंद झाला आहे. यापूर्वी २६ जानेवारी २०२५ आणि १ मे २०२५ रोजी उपोषण करण्यात आले होते. दोन्ही वेळा प्रशासनाने कारवाईचे आश्वासन दिले होते. पण ती आश्वासने केवळ कागदावरच राहिली. १ मे रोजी तर ग्रामपंचायत आणि गटविकास अधिकारी यांनी ३० दिवसांच्या आत अतिक्रमण काढून रस्ता डांबरीकरण करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र तेही पूर्ण झाले नाही असे ग्रामस्थांनी सांगितले.

दरम्यान, रस्त्यावरील सर्व अतिक्रमण काढून रस्ता पूर्णपणे खुला करावा, मोकळा झालेला रस्ता कायदेशीररित्या पक्का करून वाहतुकीस योग्य बनवावा तसेच रस्त्याचे डांबरीकरण करून तो मजबूत बनवण्याची मागणीही श्री. साटेलकर यांनी केली आहे. प्रत्येक वेळी उपोषणाची तारीख जाहीर झाल्यावरच प्रशासन थोडीफार हालचाल करते. पण, काम मात्र अर्धवटच राहते असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. जोपर्यंत या मागण्या पूर्ण होत नाहीत आणि रस्ता पूर्णपणे मोकळा व पक्का होत नाही, तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे. यावेळी उपोषणकर्ते आत्माराम साटेलकर, धाकोरे माजी सरपंच अजित नातू, मिलन आसोलकर, सिद्देश गोवेकर, दिगंबर गोवेकर, मोहन मुळीक, सुरेश आसोलकर, साक्षी गोवेकर, स्मिता गोवेकर, रूचिता पालयेकर आदींसह मोठ्या संख्येने धाकोरे ग्रामस्थ उपस्थित होते.
लेखी आश्वासन नंतर उपोषण मागे!


दरम्यान, धाकोरे ग्रामस्थांच्या या उपोषणाची प्रशासनाने चांगलीच दखल घेतली व 3 सप्टेंबर 2025 रोजी ग्रामस्थांच्या मागणीनुसार भूमी अभिलेख कार्यालयाकडून सदर रस्त्याची मोजणी करून व अतिक्रमण काढण्याबाबत ठोस भूमिका घेण्यात येईल, असे ग्रामस्थांना व उपोषणकर्त्यांना भूमी अभिलेख कार्यालयाकडून लेखी आश्वासन देण्यात आले. त्यानंतर हे उपोषण स्थगित करण्यात आले. यावेळी भूमी अभिलेख कार्यालयाचे उप अधीक्षक विनायक ठाकरे यांच्या हस्ते व धाकोरे सरपंच स्नेहा मुळीक यांच्या उपस्थितीत उपोषणकर्ते आत्माराम साटेलकर यांना शरबत देऊन हे उपोषण त्वरित स्थगित करण्यात आले.


