सावंतवाडी : चराठा हे आमचे गाव अत्यंत शिस्तबद्ध, शांतताप्रिय आणि गुण्यागोविंदाने नांदत असताना आपल्या उपसरपंच पदावर गंडांतर आल्यानंतर अमित परब यांनी उगीचच आमच्या आदर्श गावाच्या अस्मितेला धोका पोहोचेल असे वर्तन चालवले आहे. त्यांनी वेळीच आमच्या गावाची आणि ग्रामपंचायतची झालेली बदनामी याबाबत जाहीर माफी मागावी अन्यथा त्यांच्या विरोधात आम्ही बदनामीकारक व मानहानीकारक धावा ठोकू. तसेच त्यांच्या आरोपांवर आमच्या गावातील सुज्ञ मतदार आगामी काळात त्यांना नक्कीच मतपेटीतून उत्तर देतील.
अमित परब यांना आपले पद जाण्याच्या मार्गावर दिसल्याने त्यांची मानसिकता खराब झाल्यामुळे ते उगीचचं बिनबुडाचे आरोप सरपंच, ग्रामसेवक आणि इतर सदस्यांवर लावत आहेत. अमित परब हे अत्यंत भ्रमक व्यक्तिमत्व असून त्यांच्या वागण्यामुळे आमच्या गावाची नाहक बदनामी होत असल्याचा आरोप चराठे गावाच्या सरपंच व इतर सदस्यांनी केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, चराठा सरपंच व सदस्यांनी अविश्वास ठराव घेऊन उपसरपंच पदावरून पानउतारा केल्यामुळे ग्रामपंचायत सदस्य असलेले व सद्य:स्थितीत मानसिकदृष्ट्या अत्यंत कमकुवत झालेले अमित परब हे सैरभैर झाले आहेत. सद्या त्यांनी चराठा सरपंच व ग्रामसेवकावर बिनबुडाचे आरोप लावण्याची लावण्याचे कुटील षडयंत्र चालवले आहे. स्वतः ते उपसरपंच पदावर असताना आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून त्यांनी गावात एक देखील विकास काम आणलं नाही. म्हणून त्यांना आमच्या विकास कामांवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. जर त्यांनी विकास कामांवर बोलायचे ठरवलेच असेल तर त्यांना आम्ही सांगू इच्छितो की आमचे स्थानिक नेते व आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून आम्ही आजपर्यंत कोट्यावधीची कामे करू शकलो आहोत. मात्र अमित परब आणि त्यांच्यासोबत मानसिकदृष्ट्या कमकुवत झालेले त्यांचे सहकारी प्रसारमाध्यमांतून खोट्या आणि मानहानीकारक बातम्या पसरवत आहेत. वास्तविक आमच्या ग्रामपंचायतचा पारदर्शक कारभार चाललेला असताना त्यांनी केलेला एक तरी आरोप सिद्ध करावा. तसे न झाल्यास आपल्या सदस्य पदाचा राजीनामा द्यावा, असा रोखठोक सवाल सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी अमित परब यांना केला आहे.


