सावंतवाडी : राज्याचे माजी शालेय शिक्षणमंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर यांनी आज गुरुवारी दीड दिवसांच्या गणपती बाप्पाचे आपल्या कुटुंबियांसमवेत पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन केले. त्यांनी शाडू मातीची गणेश मूर्ती नैसर्गिक कुंडांमध्ये विसर्जित करून पर्यावरणाची काळजी घेण्याचा संदेश दिला.
आमदार केसरकर यांच्या निवासस्थानी दरवर्षीप्रमाणे यावेळीही श्री गणेशाची स्थापना करण्यात आली होती. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “गणपतीची मूर्ती शाडू मातीची असल्यामुळे आम्ही तिचे विसर्जन नैसर्गिक कुंडांमध्ये पर्यावरणपूरक पद्धतीने केले.” त्यांनी सर्व गणेशभक्तांना पर्यावरणाची काळजी घेऊन गणेश विसर्जन करण्याचे आवाहन केले.
यावेळी आमदार दीपक केसरकर यांच्यासोबत त्यांचे बंधू, पत्नी माजी नगराध्यक्षा पल्लवी केसरकर तसेच समस्त केसरकर कुटुंबीय उपस्थित होते. त्यांनी सामूहिकरित्या श्री गणेश मूर्तीचे विसर्जन केले.


