Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

जिल्हाधिकारी अनिल पाटील यांचा अत्यंत संस्मरणीय निरोप समारंभ संपन्न.

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष, दूरदृष्टी असलेले आणि जनतेसाठी सदैव तत्पर जिल्हाधिकारी म्हणून अनिल पाटील यांची ओळख आहे. त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे जिल्हावासियांच्या मनात त्यांच्याविषयी आपुलकीचे स्थान आहे. कायम सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देणाऱ्या जिल्हाधिकारी अनिल पाटील यांचा निरोप समारंभ भावनिक वातावरणात पार पडला. त्यांच्या कार्याचा आढावा घेताना अनेकांच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले. जिल्हाधिकारी अनिल पाटील यांना शुक्रवारी ओरोस येथील कराळे मंगल कार्यालयात छोटेखानी समारंभात निरोप देण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, पोलिस अधीक्षक मोहन दहिकर, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, अपर पोलिस अधीक्षक नयोमी साटम, जिल्हा प्रशासनातील अधिकारी, विभाग प्रमुख यांच्या वतीने श्री पाटील यांचा शॉल व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विविध विभागांच्या वतीने अनिल पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, मित्र परिवार, आप्तेष्ठ तसेच मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या नागरिकांनी आपल्या आवडत्या अधिकाऱ्याला निरोप दिला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी श्री पाटील यांच्या कार्यकाळातील योगदानाची प्रशंसा केली आणि आपले मनोगत व्यक्त केले.

 

मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. खेबुडकर म्हणाले आपल्या साध्या, लोकाभिमुख आणि जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देणाऱ्या कार्यपद्धतीमुळे श्री. पाटील यांनी अवघ्या एक वर्षांत जिल्ह्याच्या विकासाला वेग दिला. लहानसहान प्रश्नांपासून ते मोठ्या विकास आराखड्यापर्यंत प्रत्येक बाबतीत त्यांनी संवेदनशीलता दाखवली. जिल्ह्यातील शेतकरी, विद्यार्थी, महिला, आरोग्य व शिक्षण विभाग अशा प्रत्येक घटकांशी त्यांनी संवाद साधून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांच्या कार्यकाळात जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी केलेले नियोजन, कठीण प्रसंगात दाखवलेले धैर्य, नागरिकांशी साधलेला थेट संवाद आणि प्रशासनातील पारदर्शकता हे वाखण्याजोगे आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या अनेक उपक्रम व प्रकल्पांमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याची विकासाच्या दिशेने वाटचाल झाली आहे असेही श्री खेबुडकर म्हणाले.
पोलिस अधीक्षक श्री दहिकर म्हणाले आजचा हा क्षण आमच्यासाठी अत्यंत भावनिक आहे. आपल्याला निरोप देताना मन भरून आले आहे. आपल्या कार्यकाळात आपण जिल्ह्यासाठी केलेले कार्य, आपले नेतृत्व, दूरदृष्टी आणि जनतेप्रती असलेली निस्सीम बांधिलकी आज सर्वांच्या डोळ्यांसमोर उभी आहे. आपले कार्य सदैव जिल्हावासियांच्या स्मरणात राहिल असेही श्री दहिकर म्हणाले.


अपर जिल्हाधिकारी श्रीमती साठे म्हणाल्या आपण जिल्ह्यातील प्रत्येक प्रश्नाकडे केवळ प्रशासक म्हणून नव्हे तर एक जबाबदार कर्तव्यदक्ष पालक म्हणून पाहिले. शेतकरी असो वा विद्यार्थी, सामान्य नागरिक असो वा अधिकारीवर्ग — प्रत्येकाच्या सोयीसाठी आपण तत्परतेने काम केले. कठीण प्रसंगातही आपले धैर्य, संयम आणि निर्णयक्षमता जिल्ह्यासाठी आधारवड ठरली.
निवासी उपजिल्हाधिकारी श्री सुकटे म्हणाले आपल्या मार्गदर्शनामुळे आम्हाला कार्य करण्याची नवी प्रेरणा मिळाली. आपल्या प्रामाणिकपणाचा, साधेपणाचा आणि लोकाभिमुख दृष्टिकोनाचा ठसा प्रत्येकाच्या मनात उमटला आहे. आपण केवळ जिल्हाधिकारीच नव्हे तर या जिल्ह्याचा एक आपुलकीचा कुटुंब सदस्य होता.

निरोप समारंभात विविध मान्यवरांनी त्यांचा गौरव करताना सांगितले की, जिल्हाधिकारी अनिल पाटील हे उत्तम प्रशासक तर होतेच शिवाय ते जिल्ह्याचे खरे मार्गदर्शक होते. त्यांच्या कार्याची आठवण प्रत्येकाच्या मनात कायम राहील.

यावेळी मनोगत व्यक्त करताना श्री पाटील म्हणाले की सिंधुदुर्गच्या जनतेबरोबर काम करण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट होती. या जिल्ह्यातील माणुसकी, आत्मीयता आणि सहकार्य हीच खरी ताकद आहे. अधिकारी म्हणून मी नेहमीच पारदर्शक प्रशासन, लोकाभिमुख निर्णय आणि जनतेचा विश्वास टिकवण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रवासात अनेक अडचणी आल्या, परंतु सहकारी अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी दाखवलेल्या विश्वासामुळेच त्या संकटांना सामोरे जाणे शक्य झाले. या जिल्ह्याची साथ, सहकार्य आणि प्रेम विसरणे शक्य नाही. इथल्या लोकांचा आत्मीयतेने केलेला सन्मान हा माझ्या आयुष्याचा अनमोल ठेवा आहे.या जिल्ह्यातील लोकांचे प्रेम आणि आदर मी आयुष्यभर विसरू शकणार नाही. हा सन्मान माझ्या मनात कायमचा कोरला गेला आहे. आपल्याला मिळालेली ही जबाबदारी जनतेच्या सेवेसाठी आहे. त्यामुळे प्रत्येक निर्णय, प्रत्येक पाऊल हे लोकहितासाठी असले पाहिजे.प्रत्येक माणसाची गरज वेगळी असते, त्यांचे प्रश्न वेगळे असतात. म्हणून प्रत्येकाला मनापासून ऐकणे, त्यांना समजून घेणे आणि त्यांना शक्य तितकी मदत करणे हे आपले खरे कर्तव्य आहे. कार्यालय आणि घर ही दोन क्षेत्रे वेगवेगळी ठेवली पाहिजेत. घरची चिंता कार्यालयात आणायची नाही आणि कार्यालयातील तणाव घरी न्यायचा नाही. असे केल्याने आपण अधिक एकाग्रतेने आणि अधिक शिस्तबद्धतेने काम करू शकतो.कामाचे नियोजन आणि वेळेचे व्यवस्थापन हेच आपल्या यशाचे खरे गुपित आहे. नियमांची सांगड घालून, सकारात्मक विचार करून आपण कोणतीही कठीण परिस्थिती सहज पार करू शकतो. सामान्य माणसांचे म्हणणे नीट ऐकून घ्या आणि त्यांच्या समस्या सोडवा. यामध्ये जे समाधान आहे ते कशातही नाही असेही ते म्हणाले. त्यांच्या या भावनिक मनोगतामुळे सभागृहात उपस्थित सर्वांचे डोळे पाणावले. टाळ्यांचा गजर आणि उभे राहून दिलेला सन्मान यामध्ये निरोप समारंभ संस्मरणीय ठरला.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles