सावंतवाडी : तालुक्यातील नेमळे गाव तंटामुक्ती अध्यक्ष पदी पुन्हा एकदा गोपाळ(तात्या) शांताराम राऊळ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. नेमळे गावाची तहकूब ग्रामसभा ३० ऑगस्ट रोजी नेमळे ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आली. यावेळी विविध विकास कामावर चर्चा करण्यात आली. तसेच केंद्र शासनाच्या आदेशानुसार स्वयं चलित हवामान केंद्र बसविण्यासाठी शासकीय तसेच बागायतदारांच्या पसंतीची जागा उपलब्ध करून देण्यासाठी आंबा पिक उत्पादक शेतकऱ्यांशी चर्चा करण्यात आली.
तसेच बरीच वर्ष प्रतीक्षेत असलेल्या ग्रामपंचायतीच्या मालकीच्या चार स्मशान भूमी या स्मशान भूमीच्या असलेल्या ग्रामपंचायत मालकीच्या जागाची अति तातडीची मोजणी करून त्या जागेत लवकरात लवकर स्मशान बांधणी करणे संदर्भात एकमताने निर्णय घेण्यात आला.
यावेळी नेमळे ग्रामस्थांनी नेमळे उपसरपंच सखाराम राऊळ यांचे आभार मानले. नेमळे ग्रामपंचायतीला ६५ वर्षे झाली मात्र एकाही सरपंच उपसरपंचाने आजपर्यंत या चार स्मशान भूमी मोजणी संदर्भात निर्णय घेतले नव्हते. मात्र उपसरपंच सखाराम राऊळ यांनी हा निर्णय घेतल्यामुळे भविष्यात नेमळे गावात स्मशान भूमी संदर्भात कुणाचीही गैरसोय होणार नाही, असे गौरवोद्गार काढून उपसरपंचांचे ग्रामस्थांनी आभार मानले. तसेच या ग्रामसभेला अनुपस्थित असलेल्या वनविभाग कर्मचारी, शिक्षक, आरोग्य सेवक, तलाठी यांच्याविषयी नाराजी व्यक्त करण्यात आली. यावेळी नेमळे सरपंच दीपिका भैरे, उपसरपंच सखाराम राऊळ, नेमळे गाव तंटामुक्ती अध्यक्ष भास्कर राऊळ, गोपाळ राऊळ, आंबा बागायतदार संघटनेच्या उपाध्यक्ष दिव्या वायंगणकर, ग्रामसेवक श्री. चौहान सर्व सदस्य तसेच ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.


