सावंतवाडी : गणेशोत्सवाच्या निमित्ताने पाच दिवसांच्या उत्साह-उमंगानंतर रविवारी मळगावात गणरायांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. सकल गावकऱ्यांच्या उपस्थितीत “गणपती बाप्पा मोरया – पुढच्या वर्षी लवकर या” अशा जयघोषात बाप्पांचे विसर्जन पार पडले.

गावातील घरगुती गणपतींचे मिरवणुकीतून विसर्जन करण्यात आले. महिलांनी पारंपरिक फुगड्या सादर केल्या तर युवकांनी आरत्यांनी उत्साह वाढवला. पावसाची हलकी रिपरिप सुरू असतानाही गावकऱ्यांचा उत्साह जराही कमी झाला नाही.

संपूर्ण मिरवणुकीत सांस्कृतिक विविधता, भक्तिमय वातावरण आणि उत्साहाचे दर्शन घडले. अखेर गणेश विसर्जन तळीवर गणपतींचे विसर्जन करताना भाविकांच्या डोळ्यात अश्रू दाटले. पुढच्या वर्षी पुन्हा बाप्पा आपल्या घरी येणार या आशेने भाविकांनी निरोप दिला.


