- मराठा समाज बांधवाना व्हाट्सअपच्या माध्यमातून आदोलनात सहभागी होण्यासाठी केले होते आवाहन
सावंतवाडी : गणपती उत्सवाचा पारंपरिक उत्साह असूनही मराठा आरक्षणासाठी झटणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या घरातील गणपती दीड दिवस ठेवून थेट सह्याद्री पट्ट्याकडे धाव घेतली. या त्याग आणि लढाऊ वृत्तीबद्दल सकल मराठा समाज जिल्हाध्यक्ष सिताराम गावडे यांनी कार्यकर्त्यांचे जाहीर आभार मानले.
बांदा, असनिये, तांबोळी, चौकुळ, भेडशी, साटेली, कोणाळ, मालवण, वेंगुर्ला, वैभववाडी अशा तालुक्यांमधून मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी गणेशोत्सवातली घरगुती जबाबदारी पूर्ण करून आंदोलनस्थळी सहभाग नोंदवला. सरकारने जीआर जाहीर केल्यानंतर या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सवही साजरा केला.
जिल्हाध्यक्ष गावडे म्हणाले, “गणपतीच्या काळातदेखील समाजकारणाची नाळ जपून कार्यकर्त्यांनी ‘आधी लग्न कोंढाण्याचे’ या म्हणीप्रमाणे आरक्षणासाठी तहानभूक विसरून आझाद मैदानावर लढा दिला. सरकारला जीआर काढावा लागला, याचे श्रेय प्रत्येक मराठा बांधवाच्या एकजुटीत आहे. या त्यागासाठी मी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो.”
सध्या सकल मराठा समाजाची अधिकृत नोंदणी झाल्यानंतर अनेक कार्यकर्ते परिवारात सामील होत असून लवकरच जिल्हा कार्यकारिणी जाहीर होणार आहे. “मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली समाजात एक वेगळी ताकद निर्माण झाली आहे. प्रत्येक मराठ्याने त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे ही काळाची गरज आहे. एकजुटीनेच समाजाचे भले होईल,” असेही गावडे यांनी ठामपणे सांगितले.
https://youtube.com/shorts/xKLOqu04dqw?feature=share


