सावंतवाडी : सावंतवाडी पोलिस ठाण्यातील पोलिसांच्या गणरायाला १९ व्या दिवशी वाजत, गाजत निरोप देण्यात आला. पुढच्या वर्षी लवकर या….! अशी साद घालत बाप्पाला निरोप देण्यात आला. रात्री मोती तलाव येथे गणेशभक्तांच्या जल्लोषात लड्याक्या बाप्पाचे थाटामाटात विसर्जन करण्यात आले. ढोल ताशांचा गजर, बेंजोचा नाद अन् पोलिसांचा उत्साह विसर्जन मिरवणूक खास आकर्षण ठरला.
सण, उत्सवात नेहमी गस्तीवर असणारे पोलिस आज बेभान होऊन नाचले. लाडक्या गणरायाला त्यांनी भक्तिभावाने निरोप दिला. फुलांनी सजवलेल्या रथातून निघालेली बाप्पाची स्वारी विशेष आकर्षण ठरली. सावंतवाडी पोलिस ठाणे येथे हा बाप्पा १९ दिवसांसाठी विराजमान होतो. पोलिस अन् पोलिसांच्या कुटुंबांकडून या गणरायाची सेवा केली जाते. इतर सर्व गणपतींच विसर्जन झाल्यानंतर व २१ दिवसांच्या गणरायाला निरोप देण्यापूर्वी या गणपतीचे १९ व्या दिवशी विसर्जन होते.

पोलिस ठाण्यातून विसर्जन मिरवणूकीला प्रारंभ झाला. यावेळी पोलिसांसह त्यांचे कुटुंबीय ढोल पथकाच्या तालावर थिरकताना दिसले. पोलिस निरीक्षक, इतर पोलिस अधिकाऱ्यांसह वाहतूक पोलिसही ढोलपथकाच्या तालावर बेभान होऊन नाचले. वाजत गाजत गणरायाला निरोप देण्यात आला. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या ! अशा जय घोषाने यावेळी आसमंत दुमदुमून गेला होता. गणरायाला निरोप देण्यासाठी पोलिसांसह मोठ्या संख्येने नागरिकही मोती तलावकाठी उपस्थित होते.


