सावंतवाडी : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाकडे 6 ऑगस्ट 2025 च्या शासन निर्णयामुळे ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून प्रामुख्याने काम करणाऱ्या ग्रामपंचायतीस कामगिरीनुसार प्रोत्साहित करून त्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतीला सन 2025 – 26 आर्थिक वर्षापासून तालुका, जिल्हा, महसूल विभाग व राज्य अशा चार स्तरांवर प्रोत्साहन देण्यासाठी ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ हे पुरस्कार अभियान राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.
उद्या दिनांक 17 सप्टेंबर 2025 ते 31 डिसेंबर 2025 असा या अभियानाचा कालावधी आहे.
याच अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उद्या दिनांक 17 सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता सावंतवाडी तालुक्यातील आजगाव येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रामसभेला माजी मंत्री तथा सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर हे मार्गदर्शन करणार आहेत. तरी आजगाव गावातील मतदार, ग्रामस्थ बांधव व नागरिक यांनी उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन आजगाव गावाच्या सरपंच श्रीम. यशश्री सौदागर यांनी केले आहे.


