सावंतवाडी : उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सावंतवाडी विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांनी साटेली तर्फ सातार्डा येथील लोहखनिज खाणीचे उत्खनन व वाहतूक तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे उप जिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार यांनी देत जिल्हा प्रशासनाचे आभार मानले आहेत.
ते म्हणाले, गेली दोन वर्षे, पक्षाच्या वतीने सातत्याने प्रशासनाकडे या खाणीमुळे होणाऱ्या गंभीर परिणामांकडे लक्ष वेधले जात होते. स्थानिकांना होणारा त्रास याबाबत वेळोवेळी आवाज उठवला गेला. संबंधित कंपनी आणि त्यांचे राजकीय हस्तक शासनाचे नियम धाब्यावर बसवून खुलेआम व्यवसाय करत होते. त्यांनी अनेक लोकांच्या जमिनी बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्या. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या बागायती, घरे, नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत आणि सुपीक जमिनी नष्ट झाल्या होत्या. स्थानिक लोकांचा आक्रोश आणि या समस्येची गंभीरता लक्षात घेऊन, विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ यांच्या नेतृत्वाखाली गेली तीन वर्षे सातत्याने लढा सुरू होता. या लढ्याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः खाण परिसराची पाहणी केली. पाहणीनंतर, हा व्यवसाय स्थानिक लोकांच्या आरोग्य, निवास आणि बागायतींना हानी पोहोचवत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. या निष्कर्षाच्या आधारे, त्या कंपनीच्या ४०.३७ हेक्टर क्षेत्रातील उत्खनन व वाहतुकीवर तात्काळ बंदी घालण्यात आली आहे अशी माहिती श्री. कासार यांनी दिली.


