सावंतवाडी : तालुक्यातील धाकोरे गावातील ग्रामस्थांनी ३५ वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्षाला अखेर पूर्णविराम दिला आहे. प्रशासनाच्या समन्वित प्रयत्नांमुळे, गावातील सरकारी अधिकृत रस्ता अखेर अतिक्रमणमुक्त झाला. हा ऐतिहासिक विजय धाकोरे आणि बांदिवडेवाडी येथील ग्रामस्थांच्या एकजुटीचा आणि त्यांच्या न्याय हक्काच्या लढ्याचा प्रतीक बनला आहे. तब्बल गेल्या ३५ वर्षांपासून, धाकोरे गावातील ‘होळीचे भाटले’ पासून ‘बांदिवडेवाडी’ पर्यंत जाणारा महत्त्वाचा सार्वजनिक रस्ता काही व्यक्तींच्या अतिक्रमणामुळे पूर्णपणे बंद झाला होता. यामुळे अनेक कुटुंबांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत होता. ग्रामस्थांनी वेळोवेळी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रारी केल्या, परंतु हा प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित राहिला होता. मात्र, ग्रामस्थांनी आपला लढा सोडला नाही.

सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि त्यांच्या निर्देशानुसार जवळपास 2015/2016 सालापासून ग्रामपंचायत दप्तरी नोंद असलेला आणि भूमी अभिलेख नकाशात नोंद असलेल्या रस्त्यावर असलेले अतिक्रमण ग्रामपंचायत मार्फत हटविण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सरपंच स्नेहा मुळीक, उपसरपंच रामचंद्र गवस, सदस्य अर्जुन पालव, भारती मुळीक, अल्पेशा तोरस्कर, मनाली आसोलकर यांच्या उपस्थितीत तसेच मंडळ अधिकारी कैलास गावडे, तलाठी नागराज भाऊ, कोतवाल श्री. मुळीक, पोलीस पाटील धाकोरे श्रीराम प्रभू राळकर, तंटामुक्ती अध्यक्ष महादेव कापडी, पोलीस कॉन्स्टेबल प्रसाद कदम, दीपा मठकर, देसाई कॉन्टेबल तसेच गावातील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित राहून ग्रामपंचायतच्या कामी सहकार्य केले. सर्व अधिकारी वर्गाचे तसेच ग्रामस्थ यांचे आभार धाकोरे ग्रामपंचायत मार्फत व्यक्त करण्यात आले.


