मुंबई : आज भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा वाढदिवस असून आपला वाढदिवस हा सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या हिताच्या सेवाभावी उपक्रमांमधूनच साजरा व्हावा अशा सूचना त्यांनी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिल्या होत्या. त्यानुसार राज्यात अनेक ठिकाणी सेवाभावी उपक्रम साजरे होणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांद्वारे हा कार्यक्रम उत्साहात साजरा होत आहे. वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या माध्यमातून वेंगुर्ले शहरातील सामान्य जनतेच्या आरोग्य रक्षणासाठी रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले होते.
त्याचप्रमाणे सावंतवाडी विधानसभा क्षेत्रात विविध प्रकारच्या १०० आरोग्यसेवा देणाऱ्या फिरत्या डिजिटल दवाखान्याद्वारे आरोग्य तपासणीची सुविधा नागरिकांना मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. ई-संजीवनी अँपच्या माध्यमातून ग्रामीण जनतेला आरोग्यसेवेशी जोडण्यासाठी भाजपा कार्यकर्ते विशाल परब यांच्या नेतृत्वाखाली नियोजनबद्ध संपर्कयंत्रणा राबवत आहेत ज्यातून टेलीमेडिसिन योजनेचा प्रभावी लाभ ग्रामीण भागातील जनतेला मिळवून देण्यात येणार आहे. उद्या सावंतवाडी शहरात भव्य जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा होत असून त्याचे नियोजन विशाल परब यांच्या संकल्पनेतून होत आहे. विविध सामाजिक सेवा उपक्रमातून आमच्या सर्वांच्या लाडक्या संघटनानिष्ठ, कर्तव्यदक्ष आणि सेवाव्रती नेतृत्वाला शुभेच्छा व्यक्त करण्यातला आनंद फार मोठा आहे अशा भावना यावेळी विशाल परब यांनी व्यक्त केल्या आहेत.
आज मुंबई येथे भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्रदादा चव्हाण यांची भेट घेत श्री विशाल परब यांनी त्यांचे अभिष्टचिंतन करत वाढदिवसानिमित्ताने निरोगी दीर्घायुष्याच्या व यशस्वी वाटचालीच्या शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी श्री विशाल परब यांच्यासमवेत भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी ॲड.अनिल निरवडेकर हेदेखील उपस्थित होते.


