कोकणच्या पार्श्वभूमीवरचे दशावतार आणि कुर्ला टू वेंगुर्ला हे चित्रपट अलीकडे प्रदर्शित झाले आणि समाजमाध्यमावर अनेकांनी कोकण विकासाची चळवळ जन्माला आली असल्याची हाकाटी चालवली. या चित्रपटाचे सातत्याने प्रमोशन करणाऱ्या एका ग्रुपवर प्रतिक्रिया दिली की चित्रपट हे उत्तम समाजमाध्यम असले आणि त्यातून कितीही प्रभावीपणे विषय सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत असला तरीही…. तुम्ही काही ही कोकणविकासाची चळवळ चळवळ म्हणून प्रचंड वळवळ चालवली आहात ते काही आपल्याला पटत नाही! झालं… आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास! आम्ही कोकण विकासाचे मारेकरी असल्यासारख्या प्रतिक्रियांचे प्रतिहल्ले सुरु झाले!
अनेकांना माझी ती प्रतिक्रिया आवडली नव्हती, हे वास्तव आहे आणि त्या सगळ्या स्वप्नाळू भावनांचा मी आदरच करतो.
पण…. लाटेवर स्वार होऊन चळवळ करता येत नाही, त्यासाठी मातीच्या मुळात बीज होऊन अंकुरावं लागतं. आणि ही प्रक्रिया सोपी नाही हे आपण जाणतो. त्यापेक्षा लाटेवर स्वार होत विकासाकडे झेप घेत असल्याच्या आभासी जगात स्वतः जगणं आणि इतरांना त्यावर झुलवणं सोपं असतं.. पण हे शाश्वत नव्हे, अल्पकालीन!


दशावतार, कुर्ला टू वेंगुर्ला यासारख्या कोकणी पार्श्वभूमीवरचे चित्रपट येत आहेत त्याचे आम्ही कौतुकच करतो. त्यातही कुर्ला टू वेंगुर्ला चित्रपट निर्मिती मागचे कष्ट, अमरजीत आमले आणि आपल्या शारीरिक आर्थिक अडचणींवर मात करून वेगळे काही देण्याचा ध्यास पूर्ततेकडे नेलेल्या त्या टीमच्या प्रयत्नांना सलामच आहे, त्याबद्दल बिलकुल दुमत नाही.
पण, यातून कोकणच्या गंभीर प्रश्नांच्या वेदनेवर फक्त एक फुंकर बसू शकते. आणि… फुंकरेने वेदना काही काळ शमतात, पण जखमा आहे तिथेच असतात. त्या फुंकरेने बऱ्या होत नसतात, त्याला मुळापासून उपचारांची, कदाचित शस्त्रक्रियेची गरज असते.
कीर्तनाने न सुधारणारे आणि तमाशाने न बिघडणारे… आम्ही कोकणी!
काही दिवसांपूर्वी “काश्मीर फाईल्स” चित्रपट प्रदर्शित झाला. तो वास्तव की कल्पित यावर वांझोट्या चर्चाही खूप रंगल्या. कॉलेजमध्ये काश्मीर आंदोलनात आम्ही कित्येक काश्मिरी विद्यार्थ्यांना भेटलो, पाकिस्तानने राबवलेल्या ऑपरेशन टोपाझचे काश्मीरमधले घातक परिणाम पाहिले. तत्कालीन नादान सरकार अनुभवलं..काश्मिरी पंडितांवरचे सहन करण्यापलीकडचे अत्याचार सुन्न होत ऐकले. काश्मीर फाइल्स चित्रपटाने ते अलीकडेच समाजापुढे आणले. प्रबोधन झाले. पुढे काय? बंगाल फाइल्स चित्रपटाबाबतही हीच परिस्थिती!
फार कशाला? छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरचा छावा प्रदर्शित झाला, तेव्हा तर त्या वेदनेची हिंदुत्ववादी लाट अक्षरशः सुनामी होऊन समाजावर कोसळली. पुढे काय? तमाशा असो वा कीर्तन.. जोवर शाश्वतपणे आपण कोणत्याही प्रश्नांच्या मुळाशी जात नाही, तोवर लाटा येवो वा सुनामी… आपल्यासाठी ते क्षणिक मनोरंजनच ठरते. ती चळवळ होऊ शकत नाही. जेन झेड आंदोलन असो किंवा अण्णा हजारेंचे लोकपाल कायद्यासाठीचे आंदोलन असो, शाश्वत बदलासाठी काम करणारी बीजे कुठेतरी स्वतःला सुप्तपणे गाडून घेत नाहीत, तोवर खऱ्या अर्थाने बदलाची चळवळ निर्माण होऊच शकत नाही. त्यातून फायदा उठवणारे कोणीतरी केजरीवाल, कोणीतरी सुशीला कार्की तेवढे सत्तेत येणार आणि पुन्हा काही काळ जनतेला मूर्ख बनवण्याचा खेळ सुरू होणार. सत्ताकारण असो किंवा समाजकारण, अनेकदा हेच होते, किंबहुना काहींना हे असेच व्हायला हवे असते. त्यासाठीच लाटेला चळवळ ठरवली जाते.
चळवळ ती असते जी शाश्वत बदलाला आकार देते. या विषयावर भविष्यातही आपण बोलणार आहोत. चर्चा होतच राहील. पण आज एक छोटेसे उदाहरण देतो. “गोष्ट छोटी…डोंगराएवढी” म्हणतात ना तसं!
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आरएसएस या संघटनाला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. तुम्ही कधी पाहिलंत चित्रपटातून त्या संघटनाच्या कामाचे कॅम्पेनिंग? कधी ऐकलात संघाला आपल्या विरोधीतील जहरी टीकेला उत्तर देताना? स्वतःहून पुढे आलेले अनेक “स्वयं”सेवक कसलाही गाजावाजा न करता, प्रसिद्धीच्या झोतात न येता देशभरात अनेक ठिकाणी आपले आयुष्यच्या आयुष्य देशाकरता वाहतात. अनेकदा काही भागात ते समाजद्रोही संघटनांकडून मारलेही जातात. केरळ, मिझोराम आसामसारख्या राज्यात धर्मांध शक्तींकडून त्यांच्या कित्येक हत्या झाल्यात. पण… चित्रपटातून त्याची लाट कोणी कधी अनुभवली आहे का? संयमाने अनेक वर्षे अशी लाखो बीजे देशभरात संघाच्या मुशीत स्वतःला गाडून घेतात, तेव्हा जन्माला येते ती असते चळवळ!
केवळ दोन खासदार लोकसभेत असलेला भाजपासारखा पक्ष काँग्रेसला संपवून २०१४ मध्ये बहुमतात आलेला आपल्याला दिसतो. ईव्हीएमच्या नावाने शंख करणे आपल्याला सोपे असते. पण बदल जेव्हा शाश्वततेचे स्वप्न घडवतो, तेव्हा जन्माला येणारी चळवळ ही प्रचंड ताकदवान असते. त्यातून हे घडते.
अर्थात, मूळ विषय होता कोकणचा! कोकण आज आपला कोकणी बाणाच नव्हे तर कोकणीपणाच हरवण्याच्या मार्गांवर आहे. काश्मीरमध्ये पंडितांना बंदुकीच्या नळीवर बोट ठेवून हाकललं गेलं, त्याची चर्चा झाली. पण कोकणी माणसाला केवळ जगण्यासाठी, रोजगारासाठी स्थलांतरीत व्हावं लागेल अशी परिस्थिती निर्माण केली गेली आणि….
आणि खूप काही आता कोकणीपणा आणि मुख्यत्वे कोकणीबाणाच हरवलेल्या आपल्या सर्वांच्या लाडक्या कोकणात घडते आहे. जे घडते आहे ते अस्वस्थ करणारे आहे, पण चर्चेच्या दायऱ्याबाहेर आहे, आणि केवळ चर्चा प्रबोधनाने ते बदलणारे नाही. कोकणचा विकास कसा करायचा हे आता कोकणी माणूस नव्हे तर अन्य कोणीतरी आपल्या सोयीने ठरवू लागले आहेत आणि कोकणी माणूस राजकीय झेंड्यांच्या झापडाखाली तथाकथित विकासाच्या स्वप्नाच्या रहाटगाडग्याला जुंपला गेला आहे.
मनोरंजनाच्या लाटेला चळवळ म्हणणे इथे मला का मान्य नाही याची उत्तरे आपल्याला सगळ्यांनाच शोधायची आहेत. ती शोधावीच लागतील. चार चांगले चित्रपट येऊन बदल घडणार नाही. जखमांवरच्या फुंकरीपेक्षा जखमांवर कायम उपचार करण्याच्या कठीण प्रक्रियेवर आपणा सर्वांनाच काम करावे लागेल.
त्यातही आशेचा किरण एवढाच की काही माणसे त्या दिशेने काम करत आहेत. अंधार दूर होवो न होवो पणतीची भूमिका बजावत आहेत. समाजसेवेच्या माध्यमातून काहीतरी करण्यासाठी आपल्या परीने धडपडत आहेत. त्यांना एकत्र साथ देण्यातून भविष्यात नक्कीच चळवळ रुजू शकते, घडू शकते, वाढू शकते. फक्त मतभेद आणि क्षणिक स्वार्थ बाजूला ठेवून हे काम व्हायला हवे. हे सोपे नाही, पण आजच सुरुवात झाली तर अशक्यही नाही!
तूर्तास दशावतार आणि कुर्ला टू वेंगुर्लासारख्या चित्रपटांचे स्वागत! कौतुक!! आणि चांगल्या आर्थिक यशासाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छाही!
– अविनाश गंगाधर पराडकर, सिंधुदुर्ग
9422957575


