सावंतवाडी : येथील शिवप्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सावंतवाडी शहरात नवरात्रोत्सवानिमित्त ‘दुर्गामाता दौडी’चे आयोजन करण्यात आले आहे. शहरात सलग दहाव्या वर्षी होणाऱ्या या उपक्रमात सर्व हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
घटस्थापनेच्या दिवसापासून ते विजयादशमीपर्यंत (दसरा) ही दौड दररोज सकाळी ६:१५ वाजता उभाबाजार येथील शिवतीर्थापासून सुरू होईल. या दौडीदरम्यान दररोज शहरातील वेगवेगळ्या देवीच्या मंदिरात जाऊन देव, देश आणि हिंदू धर्माच्या रक्षणासाठी सामूहिक प्रार्थना करण्यात येणार असल्याची माहिती शिवप्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
गेली नऊ वर्षे हा धार्मिक आणि सामाजिक उपक्रम सावंतवाडीत यशस्वीपणे राबवला जात आहे. यामध्ये केवळ युवकच नव्हे, तर महिला आणि ज्येष्ठ नागरिकही मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. या परंपरेनुसार, यंदाही सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन हा उपक्रम यशस्वी करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


