कुडाळ : तालुक्यातील साळगांव घाटकरनगर येथील श्री भवानीमाता मंदिरात शारदीय नवरात्रोत्सव २०२५ निमित्ताने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक २९ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान माता भक्तांसाठी भव्य कार्यक्रमांची मालिका साजरी होत आहे.
उदघाटन दिवशी घटस्थापना, तसेच विप्रपूजन, महिलांसाठी गरबा नृत्य आणि स्थानिक भाविकांकडून प्रारंभीक भजन सादर करण्यात आले. यानंतर दररोज संध्याकाळी महाआरती, युवती व महिलांचे गरबा नृत्य, विविध धार्मिक गीते व भजने, तसेच स्थानिक कलाकारांचे सादरीकरण हे आकर्षण ठरत आहे.
ललिता पंचमी दिवशी महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभ, फुलांची नृत्य साजशृंगार स्पर्धा, तर शनिवारी श्री भवानीमातेच्या प्राचीन पालखीचे भजन मिरवणूक (माढाच्या वाडीपासून प्रारंभ) होणार आहे. रविवारी श्री लिंगेश्वर प्रतिष्ठान मंडळ व श्री निवृत्ती खांडगे यांचे सुगम भजन होणार असून भक्तांसाठी हे विशेष आकर्षण ठरणार आहे.
दुर्गाष्टमी दिवशी अखंड सोवळे, देवीचा महाभिषेक व भंडारा, तसेच सांस्कृतिक कार्यक्रम व भक्तिरस भरलेली गीते यामुळे वातावरण भक्तिमय होणार आहे.
यंदा २ ऑक्टोबर रोजी विजयादशमीच्या दिवशी उत्सवाची सांगता सीमोल्लंघन व ग्राम पूजनाने होणार असून, नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी मंदिरात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.


