कणकवली : शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने गोपुरी आश्रमात आयोजित ‘जागर स्त्रीशक्तीचा, उत्सव विचारांचा’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या माळेत कलानिष्ठ आणि श्रमनिष्ठ जीवनाची उपासक, पद्मश्री सन्मानित आदिवासी चित्रकार भुरीबाई यांच्या चित्रकलेला आणि श्रमनिष्ठ जीवनाला विशेष स्थान देण्यात आले. या सोहळ्यात श्रमनिष्ठ जीवनाचा वारसा पुढे नेणाऱ्या रत्ना सूर्यवंशी यांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्यांनी श्रमाला जीवनाचा आधार मानून घालून दिलेल्या मार्गावर चालणाऱ्या कुटुंबीयांप्रती दाखवलेली कृतज्ञता ही आजच्या समाजासाठी प्रेरणादायी ठरली.
आजच्या युगात श्रमाच्या मूल्यांकडे दुर्लक्ष होत असताना, माणूस कितीही मोठा झाला तरीही शरीर आणि मनाच्या आरोग्यासाठी श्रमनिष्ठा जोपासणे आवश्यक आहे, हा संदेश या सन्मान सोहळ्यातून देण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आश्रमाच्या संचालिका अर्पिता मुंबरकर यांनी केले. त्यांच्या हस्ते रत्ना सूर्यवंशी यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश रासम यांनी केले.


