सावंतवाडी : मळगाव – तेलकाटावाडी येथील गंगाराम राऊळ कुटुंबातील लहान मुले नवरात्रोत्सव काळात एकत्र येत मोठ्या उत्साहाने आणि श्रद्धेने स्वतः दुर्गा देवीची मूर्ती बनवून तिचे पूजन करून नवरात्रोत्सव सण उत्साहात साजरा करतात. यंदाचे देवीचे पाचवे वर्ष असून या बालकलाकारांच्या या नि: स्वार्थ भावनेने परंपरा जपण्याच्या प्रयत्नाचे परिसरातून कौतुक होत आहे. नवरात्री उत्सवास जिल्ह्यात मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. सार्वजनिक मंडळांच्यावतीने मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा करण्यात येतो. मात्र तेलकाटावाडी येथील गंगाराम राऊळ कुटुंबातील लहान मुले स्वतः मूर्ती तयार करून घरीच तीचे पूजन करतात. यात नितीन उत्तम गावकर, हर्षिता सहदेव राऊळ, समीक्षा सहदेव राऊळ, संस्कृती संतोष राऊळ आणि सर्वेश संतोष राऊळ ही लहान मंडळी सक्रिय सहभाग घेत स्वतः मूर्ती घडवितात. मूर्ती घडविणे, सजावट करणे, पूजन करणे आदीतून या मुलांनी एक सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमाचे सुंदर उदाहरण उभे केले आहे.
गणेश चतुर्थी सण झाला रे झाला की ही सर्व लहान मंडळी नवरात्रोत्सवात येणाऱ्या देवीच्या तयारीला लागतात. जसा गणेश चतुर्थीचा उत्साह या मुलांमध्ये असतो तसाच नवरात्री सणाचाही उत्साह या मुलांमध्ये असतो. जवळच असलेल्या गणेश चित्र शाळेतून चिकट माती आणून देवीची मूर्ती ही मुले स्वतः च बनवितात. तसेच देवीचे कोरीव काम, रंगकाम, नक्षीकाम ही मुले स्वतः च करतात. यात नितीन गावकर व हर्षिता राऊळ ही विशेष मेहनत घेतात. तर समीक्षा राऊळ, संस्कृती राऊळ व सर्वेश राऊळ आदी मंडळी या कामात त्यांना सहकार्य करतात. देवीच्या आदल्या दिवशी देवीच्या पूजेसाठीची आरास आणि मंडप सजावटीची तयारीही मुले स्वतः करतात. या कामामध्ये घरातील ज्येष्ठ व्यक्तीही त्यांना मार्गदर्शन व सहकार्य करतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही या सर्व लहान मुलांनी एकत्र येत स्वतः देवींची मूर्ती बनवून तिचे पूजन केले. नवरात्रीच्या या नऊ दिवसात फुगडी, दांडिया, भजन, रेकॉर्ड डान्स आदी धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. अशा प्रकारे या मुलांनी परंपरेशी नाते घट्ट करत त्यांनी आपल्या हाताने संस्कार आणि सृजनशीलता यांचा संगम घडविला आहे. या बाल उपक्रमामुळे लहान वयातच जबाबदारीची जाणीव, सांघिक कार्याची सवय आणि परंपरेची ओळख या मुलांनी जपली आहे.
बालकांनी मनोभावे साकारली देवीची मूर्ती! ; मळगाव-तेलकाटावाडी येथील बालकलाकारांच्या निस्वार्थ भावनेच्या प्रयत्नांचे परिसरातून कौतुक!
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


