सावंतवाडी : पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्तच्या कार्यक्रमात तळागाळातील गोरगरीब माणसांसाठी कार्य करण्याचा भाजपा पदाधिकाऱ्यांनी संकल्प केला. भारतीय जनसंघाचे संस्थापक आणि एकात्म मानवतावादाचे प्रणेते पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. या निमित्ताने आज सावंतवाडी शहर भारतीय जनता पार्टी कार्यालय येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पंडितजींच्या कार्याची माहिती यावेळी कार्यकर्त्यांना देण्यात आली.
यावेळी भाजपा युवा नेते विशाल परब यांनी यावेळी पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून विनम्र अभिवादन केले. भारतीय जनसंघाच्या पायाभरणीत महत्त्वाचे योगदान असणारे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा पक्ष संघटनेतील सामाजिक सेवाभाव आणि कर्तव्य आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना नेहमीच आदर्शवत आणि दिशादर्शक ठरत आहे. त्यांनी निर्माण केलेल्या आदर्शांच्या पायावर विविध सेवा कार्यक्रमातून सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी आमचे कार्य सुरू आहे आणि भविष्यातही ते अविरत चालू राहील, असे प्रतिपादन यावेळी विशाल परब यांनी केले.
यावेळी भाजपाचे सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडिवरेकर, मंडळ सरचिटणीस दिलीप भालेकर, मनोज नाईक अमित परब, मंडल शहर चिटणीस संजू शिरोडकर, अमेय पै, साईनाथ जामदार, सॅबिस्टन फर्नांडिस, कुणाल सावंत, नागेश जगताप, धीरेंद्र म्हापसेकर आदि मान्यवर उपस्थित होते.


