सिंधुदुर्ग : राज्य शासनाच्या ‘लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले असले तरी, यासाठी शासनाने उपलब्ध करून दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर तांत्रिक अडचणी येत असल्याने लाभार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. वेबसाईटवर ओटीपी सेंट न होण्याची समस्या सतावत असल्याने अनेकांची ई-केवायसी प्रक्रिया अपूर्ण राहिली आहे.
घरबसल्या केवायसीची घोषणा, प्रत्यक्षात समस्यांची मालिका –
शासनाने ‘लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी घरबसल्या करता येईल, असे जाहीर केले होते. यासाठी एक विशिष्ट वेबसाईटही (website) उपलब्ध करण्यात आली आणि ई-केवायसी कशी करावी, याचे मार्गदर्शनपर तपशीलही प्रकाशित करण्यात आले. त्यामुळे अनेक लाभार्थ्यांनी दिलासा घेत स्वतःहून केवायसी करण्याचा प्रयत्न सुरू केला.
ओटीपी न मिळाल्याने लाभार्थ्यांत संताप –
गेल्या काही दिवसांपासून योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या भगिनी ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी वेबसाईटवर प्रयत्न करत आहेत. मात्र, आधारकार्ड नंबर आणि दिलेला कॅप्चा (सुरक्षा कोड) भरल्यानंतर, पुढील टप्प्यात आवश्यक असलेला ओटीपी (One-Time Password) संबंधित मोबाईल नंबरवर सेंटच होत नाही. सतत प्रयत्न करूनही वेबसाईटवर केवळ ‘एरर’ (Error) दाखवला जात आहे.
या गंभीर तांत्रिक अडचणीमुळे, शासनाच्या घोषणेनुसार घरबसल्या ई-केवायसी करण्याची सुविधा असूनही ती प्रत्यक्षात वापरता येत नाहीये. परिणामी, ‘लाडकी बहीण’ योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची भीती लाभार्थ्यांमध्ये आहे.
लाभार्थ्यांनी व्यक्त केले आहे की, ही तांत्रिक अडचण लवकरात लवकर दूर करावी, जेणेकरून ई-केवायसी प्रक्रिया सुरळीत पूर्ण होऊन योजनेच्या लाभाचा मार्ग मोकळा होईल. प्रशासनाने या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष देऊन ती मार्गी लावावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.


