सावंतवाडी : नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून श्री देवी सातेरी मंदिर नेमळे येथे भजनप्रेमी कला क्रीडा मंडळ नेमळे यांच्या वतीने महिलांसाठी ‘होम मिनिस्टर – खेळ पैठणीचा’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पैठणीच्या या कार्यक्रमात साक्षी सखाराम राऊळ हिने भज प्रेमी कला क्रीडा मित्र मंडळ पुरस्कृत प्रथम क्रमांकाची मानाची पैठणी जिंकत विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत रित्विका मिथुन घोगळे हिने द्वितीय पारितोषिक श्री देवी सातेरी मित्र मंडळ देऊळवाडी पुरस्कृत मिक्सर, तर दिव्या दत्ताराम राऊळ हिने तृतीय क्रमांक पारितोषिक आंबा बागायतदार रवींद्र दत्ताराम घोगळे पुरस्कृत टेबलं फॅन, चतुर्थ पारितोषिक उत्कर्षा उमेश परब हिस प्लास्टिक खुर्च्या सामाजिक कार्यकर्ते दिलीप भैरे पुरस्कृत तर पाचव्या क्रमांकाचे पारितोषिक आर्या अजय मुळीक यांना नेमळे उपसरपंच सखाराम शिवराम राऊळ पुरस्कृत टी पॉय देण्यात आले.






भजनप्रेमी कला क्रीडा मित्र मंडळ नेमळे यांच्या विशेष आयोजनातून सातेरी मंदिराच्या सभा मंडपात तब्बल दोन तास हा रंगातदार कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमानंतर भजनप्रेमी मित्र मंडळाच्या वतीने लकी ड्रॉ चा कार्यक्रम घेण्यात आला यात प्रथम क्रमांक यशश्री घोगळे हिस मोबाईल, द्वितीय क्रमांक गंगा राऊळ हिस स्मार्ट वॉच, तृतीय क्रमांक
निशांत मुळीक यास इस्त्री, चतुर्थ क्रमांक प्रणव नेमळेकर यास हॉट स्पॉट, तर पाचवा क्रमांक लता कोरगावकर हिस भिंती वरील घड्याळ मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. या लकी ड्रॉचे काम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी माध्यमिक शाळेचे शिक्षक उमेश राऊळ, सगुण नेमण यांनी सहकार्य केले. याच कार्यक्रमाचा भाग म्हणून लहान मुलांसाठी विविध स्पर्धाचे आयोजन करून मोबाईलपासून लहान मुलांना दूर ठेवा त्यांच्या हातात मोबाईल देऊ नका, असा मुलांच्या मातांना संदेश कार्यक्रमाचे निवेदक प्रा. रुपेश पाटील यांच्याकडून करण्यात आले. या कार्यक्रमाचे रंगतदार निवेदन नेमळे माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक राजेश गुडेकर यांनी केले तर होम मिनिस्टर कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन प्रा. रुपेश पाटील यांनी विविध खेळ, प्रश्न विचारून कार्यक्रमाची रंगत वाढविली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी देवस्थान स्थानिक उपसल्लागार समिती नेमळे यांनीही सहकार्य केले.


