सावंतवाडी : सावंतवाडीत माझ्या बालपणीच्या आठवणी आहेत. इथले लोकं माझा परिवार असून त्यांनी मला आपल्या मुलीसारखंच मानलं आहे, अशी भावना फ्लाईंग ऑफिसर तनुष्का सिंह यांनी व्यक्त केली. भारतीय हवाई दलाच्या पहिल्या महिला पायलट ठरल्याने तनुष्का सिंह यांचा दीपकभाई केसरकर मित्रमंडळाकडून सन्मान करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी फ्लाईंग ऑफिसर तनुष्का सिंह पुढे म्हणाल्या, माझे आजोबा निवृत्तीनंतर सावंतवाडीत आले होते. बालपणी मी त्यांना भेटायला इथे यायचे. ते देखील देशसेवेशी जोडलेले होते. भारतीय सैन्यात कॅप्टन म्हणून ते निवृत्त झाले होते. माझे वडील देखील सैन्यदलात होते. लेफ्टनंट कर्नल म्हणून ते निवृत्त झाले. या दोघांचा आदर्श घेऊन मी सैन्यात भरती झाले. सावंतवाडीत जेव्हा येते तेव्हा माझ्या कुटुंबातील लोकांना भेटल्यासारख वाटत. इथले लोक मला आपल्या मुलीसारखंच मानतात. इतक्या वर्षांनी आल्यावर देखील मला दिलेला सन्मान बघून फार आनंद झाला.
फ्लाईंग ऑफिसर तनुष्का सिंह यांनी इतिहास रचला असून त्या जग्वार फायटर जेट स्क्वाड्रनमध्ये कायमस्वरूपी नियुक्ती मिळवणाऱ्या पहिल्या महिला पायलट ठरल्यात. याबद्दल त्या सावंतवाडीत आल्या असता दीपकभाई केसरकर मित्रमंडळाकडून त्यांचा सन्मान करण्यात आला. देशासाठी कार्यरत असलेल्या लेकीचा आम्हाला अभिमान आहे, अशा शब्दांत माजी नगरसेविका अनारोजिन लोबो यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, शहरप्रमुख खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, महिला शहरप्रमुख भारती मोरे, माजी नगरसेविका अनारोजीन लोबो, शर्वरी धारगळकर, राजन रेडकर, गजानन नाटेकर, संजय गावडे, विश्वास घाग तसेच लेफ्टनंट कर्नल अजय प्रताप सिंह, कुसुम सिंह, अनुष्का सिंह आदींसह दीपकभाई केसरकर मित्रमंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
तनुष्का यांचे वडील आणि आजोबा यांनी भारतीय सैन्यात सेवा केली आहे. मूळच्या उत्तर प्रदेशातील असलेल्या तनुष्का, २००७ पासून मंगळुरू येथे राहत आहेत. त्यांनी सुरतकल येथील डीपीएस एमआरपीएल स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर मंगळुरू येथील शारदा पीयू कॉलेजमधून पुढील शिक्षण घेतले. २०२२ मध्ये, त्यांनी मणिपाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये बी.टेक पदवी प्राप्त केली आहे. सावंतवाडीशी त्यांचे विशेष नाते राहील आहे.


