सावंतवाडी : आज सायंकाळी वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा येथील वेळागर समुद्रात आठ पर्यटक बुडाले असून त्यातील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण अत्यवस्थ आहे. इतर चार जणांचा शोध सुरू आहे. ही घटना मनाला अस्वस्थ करणारी आहे. सिंधुदुर्ग हा आमचा अत्यंत देखणा आणि पर्यटनदृष्ट्या विलोभनीय जिल्हा असून येथे येताना पर्यटकांनी त्यांना दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन भाजप सोशल मीडिया सिंधुदुर्गच्या सावंतवाडी मतदार संघातील सोशल मीडिया मंडल संयोजक केतन आजगावकर यांनी केले आहे.

दरम्यान केतन आजगावकर पुढे म्हणतात की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्रकिनारे हे अत्यंत सुंदर आणि नयनरम्य असल्यामुळे येथे पर्यटक आपोआपच आपल्या पद्धतीने आनंद लुटतात. मात्र पर्यटकांना आकर्षित करणारे समुद्रकिनारे जीवघेणे ठरू शकतात, याची त्यांना कल्पना दिल्यानंतरही ते का म्हणून बेजबाबदारपणे वागतात?, हा मोठा यक्षप्रश्न आहे. पर्यटकांनी आपल्या जीवाची काळजी घेणे सर्वप्रथम आवश्यक आहे. तशा वारंवार प्रशासनाकडून सूचना देणारे फलक लावले जातात. वृत्तपत्र आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या देखील येत असतात. मात्र पर्यटकांनी सावधानता बाळगणे आवश्यक असताना ते बेफिकिरपणे वागतात आणि हेच त्यांच्या जीवावर बेतते. यातून हकणात जीव तर जातातच पण त्याचबरोबर आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनस्थळे देखील बदनाम होतात. प्रशासन, नागरिक, पर्यटक यांनी आता यावर गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे, असे देखील भाजपा सोशल मीडिया सावंतवाडी मंडल संयोजक केतन आजगावकर यांनी नमूद केले आहे.


