सावंतवाडी : तालुक्यातील माजगाव येथील माजगाव पंचक्रोशी मनविकास ग्रंथालय मंडळ, माजगाव या संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त उद्या शनिवार, दि. ११ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ३.०० वाजता भव्य स्नेह निमंत्रण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम ग्रंथालय सभागृह, शाळा नं. १ शेजारी, माजगाव येथे होणार आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते होणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून मंगेश मसके (अध्यक्ष, सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघ व कोकण मराठी साहित्य परिषद, सिंधुदुर्ग.), अनंत (आनंद) आपाजी वैद्य (ग्रंथ मित्र पुरस्कार प्राप्त साहित्यिक), सचिन हजारे (जिल्हा ग्रंथालय अधिकारी, सिंधुदुर्ग), कवी दीपक पटेकर (अध्यक्ष, कोकण मराठी साहित्य परिषद, सावंतवाडी), प्रा. प्रवीण बांदेकर ( ज्येष्ठ लेखक, साहित्यिक), रिचर्ड डिमेलो (सरपंच, ग्रामपंचायत माजगाव) आदि मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे:
कार्यक्रमासाठी उपस्थितीचे आवाहन ग्रंथालय मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत मुकुंद सावंत, ग्रंथपाल सौ. मधु भीमा कुंभार आणि कार्यवाह श्री. सतीश गणेश मालसे यांनी केले आहे.
हा कार्यक्रम सर्व सभासद व वाचक वर्गासाठी खास आयोजित करण्यात आला असून, ग्रंथालयाच्या ५० वर्षांच्या प्रवासाचा गौरव करण्याची ही अनोखी संधी आहे.


