- विशेष संपादकीय – रुपेश पाटील
सावंतवाडी : सावंतवाडी मतदार संघाच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी एकमेकांसमोर उभे ठाकलेले शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार व माजी मंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर आणि ऐनवेळी भाजपातून उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेत एन्ट्री केल्यानंतर तिकीट मिळविलेले माजी आमदार राजन तेली यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळेस एकमेकांवर अनेकदा जहरी टीका टिप्पणी केली होती. (जनता हे अजूनही विसरलेली नाही). या घटनेला जेमतेम वर्ष लोटले आहे. मात्र आता पुन्हा वर्षभरात एकमेकांवर टीकेचे बॉम्ब सोडणारे आता एकमेकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. कारण मागील आठवड्यातच ठाकरेंच्या सेनेला ‘जय महाराष्ट्र!’ करून दसरा मेळाव्यात राजन तेली यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. आज ते सावंतवाडी येथे दाखल होणार आहेत. यावेळी त्यांचे माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी देखील आगमन होणार आहे.
दरम्यान वर्षभरापूर्वी एकमेकांची शाब्दिक धुलाई करणारे आता एकमेकांच्या गळ्यात हार-तुरे घालण्यासाठी सज्ज झाले असल्यामुळे सावंतवाडी मतदारसंघात चर्चेला उधाण आले आहे.
आमदार दीपक केसरकर यांनी राजन तेली यांना सलग तीन वेळा पराभूत करत सावंतवाडी विधानसभेत इतिहास रचला आहे. तर केसरकरांविरुद्ध सलग तीन वेळा पराभूत होण्याचा आगळावेगळा नकोसा विक्रम राजन तेलींच्या नावावर आहे. शिवाय राजन तेली यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला त्यावेळी त्यांनी “माझ्या त्रासाचे कारण फक्त दीपक केसरकर आणि नितेश राणे आहेत”, असा टोला लगावला होता. मात्र असे असले तरी आता सगळं काही विसरून दोन्ही दिग्गज नेते एकत्र येत आहेत याचा अर्थ शिंदे सेनेची ताकद नक्कीच वाढणार आहे!
दोन्ही नेत्यांत काय आहे फरक?
माजी आमदार राजन तेली हे सातत्याने पक्ष बदलणारे नेते म्हणून ओळखले जातात तर दीपक केसरकर हे देखील कमी नाहीत. त्यांनी राष्ट्रवादीनंतर शिवसेना अर्थात ठाकरेंची सेना आणि त्यानंतर बंड करून शिंदे गटांच्या सेनेत दाखल झाले आहेत. अर्थात दोन्हीही नेते हे सातत्याने वेगवेगळ्या पक्षात जाऊन आपली राजकीय वाटचाल करत आहेत. फरक फक्त एवढाच आहे दीपक केसरकर सातत्याने निवडून येतात तर राजन तेली हे मात्र सातत्याने पराभूत होतात. (अगदी सिंधुदुर्ग बँकेच्या निवडणुकीत देखील) आता हे दोन्ही नेते एकत्र आल्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजप विरुद्ध शिंदे सेनेची सरळ लढत होणार आहे. अर्थात महायुतीतचं खरे ‘महाभारत’ रंगणार आहे, हे मात्र नक्की.
दोन्हीही दिग्गज नेत्यांना आमच्याकडून मनोभावे शुभेच्छा! फक्त हा युतीचा मेळ किती काळ टिकेल? हे देखील पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे, हे मात्र नक्कीच!


