सावंतवाडी : तालुक्यातील मळगाव येथे सायंकाळी सुमारे ४:४५ वाजताच्या सुमारास इनोव्हा कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार सुरज परब (रा. तळवडे) जखमी झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, इनोव्हा कार सावंतवाडीच्या दिशेने जात असताना मळगाव येथून आपल्या तळवडे येथील घरी जात असलेल्या दुचाकीस्वाराला कारने धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की दुचाकी रस्त्यावर कोसळली आणि श्री. परब जखमी झाले.

घटनेनंतर नागरिकांनी तत्काळ धाव घेऊन जखमी दुचाकीस्वाराला मदत केली व त्याला उपचारासाठी रुग्णालयात हलवले. अपघातानंतर परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.
दरम्यान, मळगाव परिसरातील हा राज्य मार्ग अत्यंत अरुंद असून वाढत्या वाहतुकीमुळे वारंवार अपघात होत आहेत. नागरिकांनी या मार्गाचे तातडीने रुंदीकरण करण्याची मागणी केली आहे.


