सिंधुदुर्ग : जिल्ह्यात 850 आशा व गटप्रवर्तक अतिशय प्रामाणिकपणे जनता व आरोग्य व्यवस्था यामध्ये दुवा म्हणून काम करत असतात. अतिशय तुटपुंज्या मोबदल्यावर या आशा रात्रंदिवस काम करत असतात.
गणेशोत्सव सण पार पडल्यानंतर त्यांना जुलै महिन्याचे मानधन देण्यात आले. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याचे मानधन दसरा या सणासाठी मिळाले तर नाहीच पण दिवाळी ऐन तोंडावर आलेली असताना सुद्धा त्यांना दोन महिन्याचे मानधन मिळालेले नाही.
कोणत्याही सणाचा आनंद कर्मचाऱ्याला मिळावा म्हणून सरकार त्यांचे पगार आठ दिवस अगोदर काढू शकते. पण या कष्टकरी गोरगरीब आशा व गटप्रवर्तक याना मात्र गेल्या दोन महिन्याचे मानधन मिळालेले नाही.
कोणताही मोठा सण आला की, मध्यमवर्गीयांचे पगार सरकार वेळच्यावेळी करते कारण ती रक्कम फिरून पुन्हा वस्तू खरेदीच्या रूपाने भांडवलदारांच्या घशात जाणार असते. पण सर्वसामान्यांचे मानधन मात्र सरकार वेळेवर देत नाही कारण ती रक्कम भांडवलदारांच्या घशात न जाता शेतकऱ्यांच्याकडे अन्नधान्य खरेदीसाठी जाणारी असते. अशा पद्धतीने हे सरकार एकाच वेळी शेतकरी आणि सर्वसामान्य असंघटित कर्मचारी यांच्यावर अन्याय करत असते. तर भांडवलदारांच्या तिजोऱ्या भरण्यासाठी मुक्त हस्ते मदत करत असते.
ऐन दिवाळीत मंत्री महोदय टीव्ही वरती येऊन नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा देतील. पण या आशांच्या घरात ना दिवाळीची पणती पेटणार, ना दिवाळीचा गोड पदार्थ तयार होणार.
आशा व गटप्रवर्तकानी 10 ऑक्टोबरला मुंबईत आंदोलन केले होते, त्यावेळी आरोग्यमंत्र्यांनी जाहीर केलेले होते की चारच दिवसात आशा व गटप्रवर्तक यांचे थकीत मानधन त्यांच्या खात्यावर जमा केले जाईल, पण अद्याप त्यांचे मानधन जमा झालेले नाही.
अशा या संपूर्ण प्रशासन व्यवस्थेचा सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियन जाहीर निषेध करत आहे. आणि येत्या दोन दिवसात आशा व गटप्रवर्तक यांचे थकीत मानधन त्यांच्या खात्यात जमा करावे, अशी मागणी करत आहे, असे कॉ. विजयाराणी पाटील (अध्यक्षा ), कॉ. प्रियांका तावडे (सचिव), कॉ. वर्षा परब (खजिनदार) व सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियन CITU संलग्न यांनी कळविले आहे.


