कुडाळ : कोकण कला व शिक्षण विकास संस्था आणि ग्रामपंचायत निरूखे यांच्या संयुक्त विद्यमाने 14 व 15 ऑक्टोबर 2025 रोजी आयोजित केलेल्या मसाले बनविण्याच्या प्रशिक्षण कार्यशाळेने ग्रामीण महिलांसाठी स्वावलंबनाचा नवा मार्ग उघडला आहे. या उपक्रमात ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील 28 महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. प्रशिक्षणाचे उद्घाटन सरपंच कीर्तिकुमार तेरसे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.
या दोन दिवसीय प्रशिक्षणात महिलांना 21 प्रकारचे मसाले प्रत्यक्ष कृतीसह शिकवण्यात आले. केवळ मसाले तयार करणेच नव्हे, तर मालाची गुणवत्ता, साठवणूक, पॅकेजिंग व मार्केटिंग यासंबंधी तांत्रिक व व्यावसायिक मार्गदर्शनही देण्यात आले. यामुळे महिलांना केवळ कौशल्य नव्हे, तर व्यवसाय उभा करण्याचा आत्मविश्वासही मिळाला.

या उपक्रमामुळे महिलांना घरबसल्या लघुउद्योग सुरू करण्याची संधी प्राप्त झाली असून, त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा प्रशिक्षणातून महिलांचा सर्वांगीण विकास साधला जातो. आर्थिक स्वावलंबनामुळे त्यांच्या कुटुंबाचेही जीवनमान उंचावते. यासोबतच महिलांमध्ये उद्योजकीय दृष्टिकोन विकसित होतो, जो संपूर्ण गावाच्या विकासात मोलाची भर घालतो.

कोकण कला व शिक्षण विकास संस्था अशा प्रकारच्या उपक्रमांद्वारे ग्रामीण भागातील महिलांना मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य करत आहे. या उपक्रमांचा जिल्हा पातळीवर मोठा सकारात्मक परिणाम होत असून, अशा प्रशिक्षणांमुळे स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्याची संधी वाढते. हे प्रशिक्षण म्हणजे ग्रामीण महिलांसाठी रोजगारनिर्मितीचा एक भक्कम पाया ठरला आहे.


