जळगाव : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या जळगावतील निवासस्थानी चोरी झाली आहे. एकनाथ खडसे यांच्या जळगावमधील निवासस्थानी चोरट्यांनी मध्यरात्री दरवाजाचे कुलूप तोडत तळ मजला तसेच पहिला मजल्यावरील खोल्यांमधील कपाट उघडून चोरी केली आहे. घटनास्थळी पोलीस अधिकारी तसेच कर्मचारी दाखल झाले असून त्यांच्याकडून पाहणी केली जात आहे. आज सकाळी नेहमीप्रमाणे घरकामगार साफसफाई करण्यासाठी आल्यानंतर हा प्रकार उघड झाला आहे.
चार सोन्याच्या अंगठ्या रोख रक्कम लंपास –
दिवाळीनिमित्त एकनाथ खडसे हे बाहेरगावी होते. त्यांच्या या घरात एक सुरक्षारक्षक असतो. पण तोही सुट्टीवर होता. ही संधी साधत चोरट्यांनी एकनाथ खडसे यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यांनी घरातील सर्व कपाटं उचकलीत. सामान अस्तव्यस्त केले. त्यांनी 5 ग्रॅम वजनाच्या 4 सोन्याच्या अंगठ्या आणि 35 हजार रुपये रोख रक्कम लांबवल्याची माहिती एकनाथ खडसे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिली. तर रक्षा खडसे यांच्या खोलीतही त्यांनी प्रवेश केला आणि चोरी केल्याचे समोर आले आहे. या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे असतील किंवा इतर काही गोष्टींची जुळवाजुळव पोलिस अधिकारांकडून केले जात आहे. तळमजल्यावरील खोल्या तसेच पहिल्या मजलावरील खोल्यांमधील कपाटे तोडून त्यातील मुद्देमाल चोरून नेला आहे. याच घरामध्ये रक्षाताई खडसे यांचे देखील खुले असेल त्यांच्या खोलीतील देखील कपाटांचे कुलूप तोडून चोरट्यांनी मुद्देमाल लंपास केला आहे गेल्या काही दिवसांपूर्वीच मुक्ताईनगर शहरांमध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावर दरोडा पडल्याची घटना ताजी असतानाचा जळगाव मध्ये एकनाथ खडसे यांच्या घरी चोरी झाल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया –
या चोरीच्या घटनेविषयी एकनाथ खडसे यांनी माहिती दिली. जळगाव शहरातील शिवराम नगरमध्ये निवासस्थानी रात्री ही चोरी झाली. सकाळी हा प्रकार उघड झाला. चोरट्यांनी घरातील सामानाची आचकउचक केली आहे. माझ्या रुममधील 5 ग्रॅमच्या 4 सोन्याच्या अंगठ्या आणि 35 हजार रुपये रोख होते. गोपाळच्या रुममध्ये त्याच्या पत्नीची गहुपोत होती. एकंदरीत त्यांच्या रुममधून सात आठ तोळ्याचे सोने चोरीला गेले आहे. रक्षा खडसे यांची रुमही शेजारीच आहे. तिथेही सामान उचकलेले आहे. वॉचमन सुट्टीवर होता. रात्री केव्हा चोरी झाली हे सांगता येणार नाही. पोलिसांना या घटनेची आता सकाळी माहिती देण्यात आली. पोलीस दाखल झाले आहेत आणि ते तपास करत आहेत, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली.
घटनास्थळी श्वानपथक –
एकनाथ खडसे यांच्या चोरीच्या घटनेबद्दल पोलीस अधिकाऱ्यांनी अधिकृत माहिती दिली आहे. पोलिस उपअधीक्षक नितीन गणापुरे यांनी याविषयीची माहिती दिली. 868 ग्रॅम एवढं सोन आणि 35 हजार रुपये एवढा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेल्याची माहिती समोर आल्यास पोलिसांनी सांगितलं. घटनास्थळी श्वानपथक तसेच ठसे तज्ञांच्या माध्यमातून तपासणी केली जात आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे तसेच पोलीस ठाण्याची ही स्वतंत्र पथक चोरट्यांच्या शोधार्थ रवाना करण्यात आली आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे देखील तपासणी केली जात असून अद्याप संदर्भातली कुठलेही धागेदोरे पोलिसांना मिळालेले नसल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात जळगाव शहरातील रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.


