सावंतवाडी : तालुक्यातील आजगाव येथील विद्या विहार इंग्लिश स्कूल येथील सन १९९९ च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहभेट मेळावा आजगाव विद्या विहारमध्ये उत्साहात संपन्न झाला. तब्बल २६ वर्षांनी एकत्र येत आपल्या शाळेतील स्मृतींच जागर करत हा स्नेहमेळावा पार पडला. गेली कित्येक वर्ष हे माजी विद्यार्थी कामानिमित परगावी असतात, मात्र आपल्या मैत्रीच अतुट नातं जपण्यासाठी व आपल्या शाळेविषयी आदर भावना जतन करण्यासाठी हा स्नेहमेळावा ठेवण्यात आला होता. यासाठी माजी विद्यार्थ्यांनी सुद्धा या कार्यक्रमास भरघोस असा प्रतिसाद दिला.
या स्नेहमेळाव्यात प्रथम दीपप्रज्वन करून उपस्थितांचा परिचय करण्यात आला तसेच उपस्थित माजी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प व सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले.
आलेल्या प्रत्येक माजी विद्यार्थ्यांनी यावेळी शाळा, शिक्षकांविषयी आपल्या आठवणी जाग्या करत आपापली मनोगते व्यक्त केली. बऱ्याच वर्षांनी एकत्र आल्याने प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य दिसत होते. कार्यक्रमात आपल्या गुरुंविषयी आठवण करत तसेच मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर करण्यात आले.
यावेळी माजी विद्यार्थ्यांकडून आपली आठवण म्हणून शाळेच्या परिसरात वृक्षारोपण तसेच शाळेसाठी सिंटेक्स पाण्याची टाकी भेट म्हणून देण्यात आली. भविष्यात सुद्धा आपण सर्व जण एकत्र येत आपल्या शाळेला सहकार्य करणार असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार युसुफ आवटी यांनी केले तर सर्वच विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला शाळेचा हॉल उपलब्ध करून दिल्याबद्दलं मुख्याध्यापक उत्तम भागीत व शिक्षक वर्गाचे आभार मानले.


